स्व.गोपीनाथ मुंडे कन्यादान योजनेंतर्गत प्रथम दिव्यांग लाभार्थिला न.प.कडून 30 हजाराचे अर्थसहाय्य

0

खामगाव  –  दिव्यांग मुलीच्या लग्नासाठी खामगाव न.प.च्या वतीने राबविण्यात   येणार्‍या स्व. गोपीनाथ मुंडे कन्यादान योजनेंतर्गत प्रथम दिव्यांग लाभार्थिला 30 हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आले. आ. अ‍ॅड.आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते काल लाभार्थी  मुलीला धनादेश प्रदान करण्यात आला.

लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने खामगाव नगर पालिकेच्या वतीने ऑगस्ट 2020 पासून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर दिव्यांग शक्ती शिष्यवृत्ती योजना तसेच दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी स्व. गोपीनाथ मुंडे कन्यादान योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर दिव्यांग शक्ती योजनेंतर्गत खामगाव न.प.हद्दीतील रहिवासी दिव्यांग विद्यार्थ्यांना दरवर्षी 2 हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येत असून स्व.गोपीनाथ मुंडे कन्यादान योजनेंतर्गत न.प.हद्दीतील रहिवासी दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी 30 हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या अंतर्गत प्रथम लाभार्थी ठरलेल्या प्रेरणा अंबादास गणगे (राऊत) हिला न.प.च्या वतीने 30 हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. आ. अ‍ॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.अनिताताई डवरे, नगरसेवक सतीषआप्पा दुडे, शेखर पुरोहित, संजय शिनगारे, वैभव डवरे आदींची उपस्थिती होती.

प्रेरणा ही येथील रेखा प्लॉट भागातील अंबादास गणगे यांची कन्या असून ती दिव्यांग आहे. 24 मे 2020 रोजी तिचा औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील राहुल राऊत  यांच्याशी विवाह झालेला आहे. तिने स्व. गोपीनाथ मुंडे कन्यादान योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार तिला या योजनेचा लाभ देण्यात आला असून ती प्रथम लाभार्थी ठरली आहे.

या योजनेचा लाभ घ्यावा-नगराध्यक्षा सौ.डवरे

सामाजिक बांधिलकी जपत खामगाव न.प.ने ही योजना सुरु केलेली आहे. दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मदत व्हावी या उद्देशाने राबविण्यात येणार्‍या या योजनेचा शहरातील  गरजू दिव्यांग मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ.अनिताताई डवरे यांनी केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

1) विनंती अर्ज 2) आधार कार्ड 3) पॅनकार्ड 4) रहिवाशी दाखला 5) विवाह नोंदणी प्रमाणपत्र 6) टि.सी. 7) अपंग प्रमाणपत्र 8) विवाहाचा फोटो 10) बँक पासबुक झेरॉक्स 11) प्रतिज्ञापत्र

Leave A Reply

Your email address will not be published.