साडेपाच वर्षीय बालिकेच्या प्रसंगवधानाने वाचले आई व बहिणीचे प्राण

0


कोल्हेनगरातील रहिवासी काळे कुटुंबियांच्या शिवांगीची थक्क करणारी शौर्य गाथाच!


जळगाव  | प्रतिनिधी

आपण अनेक प्रकारच्या शौर्यकथा पहातो, वाचतो परंतु अवघ्या साडेपाच वर्षाच्या बालिकेने प्रसंगावधान राखत आईचे तसेच लहान दोन वर्षाच्या बहिणीचे विजेच्या शॉकमुळे होण्ाऱ्या मृत्यूपासून बचाव केल्याची घटना जळगाव शहरातील कोल्हेनगर मध्ये घडली.
याबाबतची हकीकत अशी की, औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपनीत प्रसाद काळे सर्व्हिसला असून कोल्हेनगरात त्यांचे घर आहे. नेहमीप्रमाणे दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी प्रसाद काळे ऑफिसला गेले. घरी पत्नी सौ. गुलबक्षी काळे (वय 33) आणि त्यांच्या दोन मुली कु. शिवांगी (वय साडेपाच वर्षे) आणि इशान्वी (वय दोन वर्षे) या होत्या. सकाळी दहा वाजेच्या सुमारास सौ. गुलबक्षी काळे यांनी मुलींच्या आंघोळीसाठी स्टीलच्या बादलीमध्ये हीटरचा रॉड लावून पाणी तापविण्यासाठी विजेचे बटन ऑन केले. दरम्यान मुली खेळत असल्याने विजेचे बटन बंद करून त्या मुलींसाठी थांबल्या. परंतु शिवांगी आणि इशान्वी या दोघी खेळण्यात मग्न असल्याने सौ. गुलबक्षी काळे यांनी हीटरचे बटन ऑन करून थोड्या वेळाने आंघोळीसाठी स्वत: बाथरूममध्ये गेल्या आणि हिटरचे बटन बंद न करताच स्टीलच्या बादलीची कडी पकडताच विजेचा जबरदस्त शॉक लागला आणि त्या जोराने किंकाळल्या. आईचे किंकाळणे ऐकून शिवींगी आणि इशान्वी दोघी धावत बाथरूममध्ये गेल्या. त्यावेळी आईच्या हातात स्टीलच्या बादलीची कडी धरलेली होती हात थरथर कापत होते. आईचे किंचाळणे चालूच होते. मोठी बहिण शिवांगीने लहान बहीण इशान्वीचा हात धरून ठेवला होता. आईचे किंकाळणे पाहून घाबरून न जाता इशान्वीचा हात पकडून तिला आईपासून दूर ठेवून प्लॉस्टीक स्टूलवर उभे राहून पहिल्यांदा हिटरचे विजेचे बटन बंद केले. तात्काळ आईच्या हातातील स्टील बादलीची कडी सुटली आणि विजेच्या शॉकमुळे होणारी भयंकर दुर्घटना टळली.
आपली आईच्या विजेच्या  शॉकमुळे किंचाळत असतांना एका क्षणाचाही विलंब झाला असता तर होत्याचे नव्हते झाले असते.

चांगल्या मोठ्या माणसांनाही जे ऐन वेळी सुचले नसते ते या चिमुकल्या शिवांगी बालिकेला सुचले. हे फार कौतुकास्पद म्हटले पाहिजे. दोन्ही बहिणी आईच्या किंचाळण्यामुळे आईला बिलगल्या असत्या तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही. साडेपाच  वर्षाच्या शिवांगीला हे प्रसंगावधान सुचलेच कसे? त्यासाठी चिमुकल्या शिवांगीचे करावे तेवढे कौतुक अपुरे आहे. चिमुकल्या शिवांगीचे प्रसंगावधान म्हणजे शौर्य होय. त्या बालिकेच्या प्रसंगावधानाचा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे. तिची ही शौर्य गाथा सर्वत्र पोहोचली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.