राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेला संजय सावकारेंनी दिला पूर्णविराम, म्हणाले…

0

जळगाव :  माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या फलकावर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याने आमदार सावकारे देखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या पक्षांतराबाबतच्या चर्चेला संजय सावकारे यांनी पूर्णविराम दिला.

आपल्या वाढदिवसानिमित्त कुणी जाहिरातीत कोणते फोटो द्यावे हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न आहे. आपले सर्व पक्षांमध्ये संबंध असले तरी आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत. खरं तर, राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या वृत्ताने आपल्याला राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. ते आज भाजपच्या जिल्हा कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्र शासनातर्फे मागासवर्गियांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात येत असल्याची चर्चा सध्या सुरू असून या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज भाजपच्या जिल्हा कार्यालयात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी मागासवर्गियांच्या स्कॉलरशीपमध्ये केंद्र व राज्य सरकारचा वाटा असून याला बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी आमदार सावकारे हे राष्ट्रवादीच्या मार्गावर असून त्यांच्या वाढदिवसाला समर्थकांनी भाजपचे चिन्हा टाकले नव्हते याकडे पत्रकारांनी लक्ष वेधून घेतले. यावर आमदार सावकारे म्हणाले की, मी भाजपचा एकनिष्ठ आहे. माझे प्रत्येक पक्षात चांगले संबंध आहेत. मी स्वत: वाढदिवसाला जाहिरात दिली नव्हती. यामुळे इतरांनी काय टाकावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. मी स्वत: दिलेल्या जाहिरातीत हा प्रकार नव्हता. यामुळे माझ्याबाबत दिलेल्या बातम्यांमुळे मला खरं तर राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली असे आमदार सावकारे यांनी याप्रसंगी हसून सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.