शिवसेनेला धक्का ; हा माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

0

नाशिक : शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप पुन्हा भाजपचा झेंडा हाती धरत आहेत. आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्याच एका गटातून उपस्थित होत आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील नरीमन पॉइंट येथील कार्यालयात भाजपप्रवेश करणार आहेत.

भाजपच्या गटातून नाराजी

बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा पुन्हा ते पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांचा फायदाच होऊ शकत असल्याने भाजपनेही सानप यांना पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱ्या नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून उपस्थित होत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर? असा सवालही भाजपमधील या गटाकडून विचारला जात आहे. सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपमधील ही लॉबी सक्रिय झाली असून त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून आपला विरोध दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, थेट प्रदेश पातळीवरूनच सानप यांना पक्षप्रवेशाच्या पायघड्या घालण्यात आल्याने भाजप नाशिकमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.