…तर अजित पवारांसोबतचे देवेंद्र फडणवीसांचे सरकार टिकले असते ; चंद्रकांत पाटील

0

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजपावर चांगलाच निशाणा साधला होता. तसेच भाजपातून महाविकास आघाडी येणाऱ्यांना पुन्हा निवडून आणू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले असून, अजित पवारांना चिमटा काढला आहे.

अजित पवारांना सोबत घेऊन दुसऱ्यांदा सत्तेत आलेले फडणवीस सरकार काही तासांतच कोसळले होते. यावरून आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या राजकीय नाट्याची आठवण देत टोला लगावला. “अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते, तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असत. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, दोन दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना, अजित पवारांनी भाजपावर निशाणा साधला होता. “विधानसभा निवडणुकीवेळी काही नेत्यांना प्रलोभने दाखवून तर काही जणांना भीती दाखवून फोडण्याचे काम भाजपा नेतृत्वाने केले. राज्यात आघाडीचे सरकार येणार नाही, असे वाटल्याने अनेकजण भाजपात गेले. मात्र, आता स्थिर सरकारमुळे आपण आघाडी का सोडली असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. जे कुणी भाजपचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील,” असे अजित पवार म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.