आ.संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर? बर्थडे पोस्टवरून कमळ व गिरीश महाजनांचा फोटो गायब

0

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसाच्या जाहिरीती, पोस्टरवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो लागले आहे. तर भाजपचे माजी मंत्री गिरीश यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आमदार संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर तर नाही? अशी चर्चा रंगू लागली आहे.

 

भाजपला रामराम करून एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून नविन राजकीय इनिंग सुरू केली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह खानदेशात भविष्यात मोठे राजकीय उलथापालथ होईल असे बोलले जात आहे.

 

याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षात भाजचे खडसे समर्थक नेते, कार्यकर्ते जाण्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत देखील प्रवेश केला.

 

त्यात आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक असून परिचित असून त्यांचा आज वाढदिवशी भुसावळ शहरात तसेच सोशल मिडीयावर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा पोस्टरवर , वृत्तपत्रात जाहिराती दिल्या आहे. यात अनेक जाहिराती व पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो लावलेला असल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

 

काही फलकांवर खासदार रक्षा खडसे व राजूमामा भोळे यांचे देखील छायाचित्र आहे. तथापि, भाजपचे चिन्ह कमळ, पक्षाचे जिल्हा नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांना मात्र स्थान देण्यात आलेले नाही.

 

संजय सावकारे हे एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. खरं तर ते २००९ साली संतोष चौधरी यांच्या पाठबळाने राष्ट्रवादीच्या तिकिटावर भुसावळातून निवडून आले होेते. दरम्यान, संतोष चौधरी हे फौजदारी खटल्यात अडकल्यानंतर चौधरी व सावकारे यांच्यात दुरावा वाढला. व ते नाथाभाऊंच्या सोबत आले. २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला आहे.

 

मध्यंतरी खडसे हे अडचणीत आले असतांना संजय सावकारे हे त्यांच्या सोबत उभे राहिले असल्याचे दिसून आले होते. परिणामी ते सुध्दा राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू झाली होती. तथापि, पोटनिवडणूक टाळण्यासाठी ते पुढील निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करतील असे मानले जात आहे. या आधीच वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांच्या समर्थकांनी भाजप व विशेष करून गिरीश महाजन यांच्यासोबतचे मतभेद स्पष्टपणे उघड करून आपले इरादे स्पष्ट केल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.