वाढीव वीजबिल माफीसाठी मनसेचे राज्यभरात ‘झटका’ आंदोलन

0

मुंबई : वाढीव वीजबिल माफीसाठी मनसेने मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार झटका आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईत मनसेने विराट मोर्चा काढला तर ठाण्यात मनसेच्या आंदोलना दरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट उडाली असून त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वीजबिल माफीसाठीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. ठाण्यात तर पोलिसांनी 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र, मनसेने हे आदेश झुगारून ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेकडून मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मोर्चा मध्येच अडवला. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स फेकून दिल्या.

‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘मनसे जिंदाबाद’, ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच पोलिसांनी अभिजीत पानसे, रवी मोरे आणि अविनाश जाधव या मनसे नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनमध्ये जाऊन बसले. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला असून पोलीस या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने मोर्चा काढला. त्यांना परवानगी मिळते. आम्हाला परवानगी दिली जात नाही. हा कुठला न्याय? ठाकरे सरकार मनसेला घाबरत आहे का?, असा सवाल करतानाच हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेकडून वीजबिल माफीला मंजुरी दिली जात नाही, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.