घाटपुरी नाका परिसरात रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

0

नागरिकांना त्रास, नगर पालिकेने अतिक्रमण हटविण्याची मागणी

खामगाव –  स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील केशव नगर करवीर कॉलनी भागातील नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी असलेला डॉ. टिकार यांचा दवाखाना असलेल्या संकुलाच्या बाजूचा रस्ता अतिक्रमणामुळे गायब होण्याच्या मार्गावर आहे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा होत असून स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. दरम्यान या रस्त्यावरील अतिक्रमणे नगर पालिकेने तातडीने हटवावीत अशी मागणी या भागातील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

 

केशव नगर, करवीर कॉलनी भागात जाण्यासाठी असलेल्या १२ मिटर रस्त्यावर गँरेज, वेल्डींगचे दुकान, भाजीचे स्टाँल लावण्यासाठी अतिक्रमण करण्यात आलेले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. हाच रस्ता  अंगणवाडीकडे जातो. त्यामुळे येथून जाणाऱ्या महिला व मुलांना गँरेज व वेल्डींगच्या दुकानामुळे शारिरीक इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना याआधी घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याठिकाणी बसलेले नागरिक बाजूला असलेल्या जागेवरच लघशंकेला व शौचास बसतात. त्यामुळे या भागातील महिला, मुलींची कुचंबना होते. तसेच या परिसरात राहत नसलेले नागरिकही त्यांचे सामान व वाहने रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवतात. या अतिक्रमणाचा आडोसा घेवून रात्रीच्या वेळी काही लोक येथे मद्यपान सुध्दा करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले असून त्यांनी महिलांना त्रास दिल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाण्याची भिती महिलांना वाटते. या रस्त्यावर शुभम इलेक्ट्रीक्स व वेल्डींगच्या दुकानाचे मोठे अतिक्रमण केलेले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साहित्य आणून ठेवले आहे. तरी या परिसरातील नागरिकांना होणारा प्रचंड त्रास लक्षात घेता सदर अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी या भागातील शेकडो नागरिकांनी केली आहे.

 

अतिक्रमणामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात

घाटपुरी नाका परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे हा भाग कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील बनत चालला आहे. वर्षभरापुर्वी अतिक्रमणाच्या कारणातूच या भागात दुहेरी हत्याकांड घडले होते. त्यानंतर पालीकेने सर्व अतिक्रमणे हटविली होती. मात्र आता ही अतिक्रमणे नव्याने थाटल्या गेली आहेत. त्यामुळे वादाचे प्रसंग होत असून यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. तरी  नगर पालिकेने व पोलिस प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून परिसरातील अतिक्रमणे हटवावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.