लोणावळ्यात शिवसेनेच्या नेत्याची भर चौकात हत्या

0

लोणावळा:  लोणावळ्यात शिवसेनेचे नेते आणि माजी शहरप्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आली. अवघ्या १२ तासांत हत्यांच्या दोन घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे. राहुल शेट्टी असे शिवसेनेच्या नेत्याचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शेट्टी हे आज सकाळी त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पिताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर मारेकर्‍यांनी तीन गोळ्या घातल्या. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यांच्या डोक्यात दोन व छातीत गोळी लागली असून, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुल शेट्टी यांना तत्काळ उपचारासाठी लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

 

तर दुसर्‍या घटनेत लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे गणेश नायडू या युवकाचाही रविवारी रात्री दहाच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या दोन्ही घटनेमुळे लोणावळा शहर हादरले आहे. दोन्ही घटना या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.

 

राहुल शेट्टी हे शिवसेनेचे मावळ तालुका संस्थापक प्रमुख दिवंगत उमेश शेट्टी यांचे पुत्र आहे. उमेश शेट्टी यांची देखील ३० ते ३५ वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज राहुल यांची निर्घृण हत्या झाली. राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, आई मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्या मार्गाने मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.