एकनाथराव खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

0

जळगाव : पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आता  खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. सोबतच त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असून ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक वृत्त आहे. पण भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्ष पूर्ण करतील, असा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता खडसे बापलेकीने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्यास उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दोन दिवसांपूर्वीच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.

कालच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख काल जळगावात होते. एकनाथ खडसे यांच्यासोबत रावेर हत्याकांडातील कुटुंबीयांची विचारपूस त्यांनी केली. त्याआधी शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चाही झाली. यावेळी काय बातचित झाली, याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. परंतु देशमुख यांनी खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.