एटीएम कार्ड क्लोनचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा पर्दाफास

0

जळगाव प्रतिनिधी । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेला हॅकर मनीष भंगाळे याच्या मदतीच्या सहायाने एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू करण्याच्या प्रयत्नात असणारी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीने कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपयांची चोरी करण्याचा प्लॅन आखला होता, असी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. यात मनीष भंगाळे हे माफीचा साक्षीदार बनला असून तो वगळता यातील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मनीष भंगाळे हा एकनाथराव खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आला होता. नंतर त्याचे दावे खोटे ठरल्याने त्याला अटक देखील करण्यात आली होती. दरम्यान, मनीष भंगाळेच्या संपर्कात जळगावातील काही जण आले होते. या लोकांनी त्याला एटीएम कार्ड क्लोनींग करण्याची मागणी केली. यानुसार त्याने कार्ड क्लोन करून एक हजार रूपये बँक खात्यातून काढले.

दरम्यान, याच प्रकारे एटीएम कार्ड क्लोन करून चारशे कोटी रूपये काढण्याची तयारी या टोळीने केली. मात्र हा सर्व प्रकार कळताच मनीष भंगाळे याने पोलिसांशी संपर्क साधला. यात पोलीस पथकाने भंगाळे याला माफीचा साक्षीदार बनविले. यानंतर रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून जळगावातून दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांना आरोपी बनविण्यात आले असून यातील उर्वरित सात जणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलीस स्थानकाच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. या संदर्भात पोलीस प्रशासन सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेऊन आरोपींसह अन्य बाबींचा तपशील जाहीर करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.