सौ र.ना. देशमुख महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय व व जयंती- पुण्यतिथी समितीच्या वतीने झूम मिटींगच्या माध्यमातून संयुक्तपणे हे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वक्ते म्हणून पुणे येथील प्रा.डॉ.शाकीर शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे चरित्र व कार्य यांच्यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. जेवढे अधिक पुस्तके आपण वाचू तेवढे आपले आयुष्य अधिकाधिक संपन्न होईल. केवळ पुस्तके असून चालणार नाही, तर ती वाचावी लागतील, त्यावर चिंतन- मनन करावे लागेल आणि त्या पुस्तकांमधील विचार आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणावे लागतील. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी जे महत्त्वपूर्ण कार्य केले त्याचा त्यांच्या लेखनामधून आपल्याला प्रत्यय येतो. एक उच्च चारित्र्याचा व असामान्य प्रतिभेचा वैज्ञानिक आपल्या देशाला राष्ट्रपती म्हणून लाभला. त्यामुळे निश्चितच आपल्या देशाची मान उंचावली गेली. म्हणूनच त्यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरे करणे निश्चितच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन डॉ.शाकीर शेख यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. एन.एन. गायकवाड होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील शेलार यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.जी.एस. अहीरराव यांनी केले. विद्यार्थी विकास अधिकारी व उपप्राचार्य प्रा.एस.आर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ६५ जणांनी झूम मिटिंगच्या माध्यमातून उपस्थिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.