निंबोल येथील विजया बँकेच्या सहायक व्यवस्थापकाची आत्महत्या

0

रावेर : तालुक्यातील निंबोल येथील विजया बँक शाखेतील सहायक व्यवस्थापकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारी घडली. पृथ्वीराज पगारे (वय ३२) असे या आत्महत्या केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. दरम्यान, बँकेतील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पृथ्वीराजने आत्महत्या केल्याचा आरोप मृताचे वडील आणि भावाने केला अाहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पगारे हे चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील रहिवासी होते. पृथ्वीराज पगारे यांना सोन्याच्या चेन घालण्याची हौस होती. त्यामुळे बहाळ गावात त्यांना “गोल्डन मॅन’ म्हणून ओळखले जात. ते सध्या रावेर येथे सुरेश पाटील यांच्या घरात एक वर्षापासून भाडेतत्त्वावर एकटे राहत होते. विजया बँकेचे कृषी विभागाचे काम त्यांच्याकडे होते. ते एकटे असल्यामुळे त्यांनी जेवणाचा डबा लावला होता. बुधवारी सकाळी गोविंदा बारी हा युवक त्यांचा जेवणाचा डबा घेऊन गेला. त्या वेळी पगारे यांनी खोलीतील छताच्या पंख्यास नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेला आढळून आले. घरमालक सुरेश चिंधू पाटील यांनी रावेर पोलिसांना माहिती कळविल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, बँकेतील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पृथ्वीराज यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मृताचे वडील आणि भाऊ यांनी केला. तसेच बँकेतील अधिकाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला.

पृथ्वीराज यांना तीन भाऊ असून एक महावितरण, दुसरा डॉक्टर अन् तिसरा एसआरपीत आहे. तर त्यांचे वडील महावितरण कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.