खामगांव कृउबा समितीच्या मुख्य प्रशासकपदी दिपक जाधव

0

खामगांव (प्रतिनिधी)  : खामगांव कृ.उ.बा.स.ची मुदत 23 जुलै 2020 रोजी संपली असतांना बाजार समिती सभापती संतोष टाले यांनी शासनाकडे सहा महिन्याची मुदत वाढ मिळविण्याचा ठराव मंजुरीसाठी पाठविला होता. परंतू राज्याचे प्रभारी सहकार व पणपमंत्री ना.जयंत पाटील यांनी सभापती यांचा 30 जुलैचा ठराव क्रं.2 अन्वयेचा संचालक मंडळास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नाकारला असुन संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश दिले आहे. 2 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने या संबंधीचे आदेश काढल्याने 3 सप्टेंबर रोजी  जिल्हा उपनिबंधक महेश कृपलानी यांनी खामगांव कृ.उ.बा.स.च्या मुख्य प्रशासकपदी दिपक जाधव (विशेष लेखा परिक्षक वर्ग- पणन सहकारी संस्था,बुलडाणा) यांची प्रशासकपदी ओमप्रकाश साळुंके (सहाय्यक निबंधक)खामगांव यांची नेमणुक केली आहे.

3 सप्टेंबर 2020 रोजी  दुपारी 3 वाजे दरम्यान बाजार समितीचे नवनियुक्त मुख्य प्रशासक दिपक जाधव व प्रशासक ओमप्रकाश साळुंके यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी बाजार समिती संचालक श्रीकृष्ण टिकार, माजी सभापती राजाराम काळणे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, पंजाबरावदादा देशमुख, संजय झुनझुनवाला, सुनील केडिया, युवक काॅंग्रेसचे तुषार चंदेल यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले.

याप्रसंगी संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी मुख्य प्रशासक दिपक जाधव व प्रशासक ओमप्रकाश साळुंके यांना बाजार समितीचे सभापती संतोष टाले यांनी भोजन पाकीट वाटप व अन्नधान्य किट वाटपासह इतर अनेक बेकायदेशीर नियमबाहय कामे करुन कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश आल्यानंतर अधिकार नसतांना सुध्दा दुपारी 2 वाजेपर्यंत सभापतींनी अनेक कामांचे देयके काढली. बाजार समितीमध्ये कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असुन संबंधीत प्रकरणाचे दस्तवेज गहाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सभापती, सचिव यांच्याकडुन या प्रकरणाची सर्व दस्तवेज घेउन झालेल्या भ्रष्टाचाराची चैकशी करण्यात यावी अशी मागणी संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.