हॉटेल्स, रेस्टॉरंट पूर्णक्षमतेने सुरू करण्यास परवानगी… हे पाळावे लागतील नियम

0

जळगाव : राज्य शासनाच्या ‘अनलॉक- ४’च्या अधिसूचनेनुसार हॉटेल्स (उपाहारगृहे) आणि रेस्टॉरंट यांना १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.मात्र, असे असले तरी हॉटेल्सचालकांनी शक्यतो पार्सल, होम डिलेव्हरीवर भर द्यावा, सांगितले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या अनलॉक चारच्या प्रक्रियेनुसार हॉटेल संदर्भात हा अध्यादेश राज्य शासनाने काढला असून लवकरच याबाबत (sop) स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर शासनाकडून प्राप्त होईल असे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी लोकशाही शी बोलताना सांगितले.

दरम्यान, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. धार्मिक स्थळे बंदच राहणार असून, राजकीय सभा, कार्यक्रमांना बंदी असेल. राज्यात प्रवासासाठी आता ई- पासची गरज नसेल. जळगाव महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’मध्येच आहे. त्यामुळे लॉकडाउन ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला असल्याने पूर्वीप्रमाणेच नियम- अटी कायम लागू राहतील, असेही सांगितले आहे.

एक सप्टेंबरपासून ‘अनलॉक- ४’ सुरू झाला. गर्दी होऊ नये, कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विविध उपाययोजना सुरूच राहणार आहे. नागरिकांनी ‘कोरोना के साथ जीवन बिताना है’ हे लक्षात घेऊनच दैनंदिन कामे करताना सामाजिक अंतर पाळणे, नाका, तोंडाला मास्क लावणे, गर्दी जाणे टाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जिम मात्र पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत. खवय्यांना दिलासा देताना या चौथ्या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरंटना पूर्णक्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी हॉटेल्सचालकांनी शक्यतो पार्सल, होम डिलेव्हरीवर भर द्यावा, असा प्रशासनाचा आग्रह आहे.

हे आहेत नियम… 

– मास्कचा वापर गरजेचा

– सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक

– सभा, गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी

– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी

– ‘वर्क फार्म होम’वर भर देण्याच्या सूचना

– निर्जंतुकीकरणास प्राधान्य देणे

– ६५ वर्षावरील नागरिकांनी घरीच राहावे

या बाबींवर बंदी… 

– देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा

– शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण कोचिंग क्लास

– सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे

– रेल्वे सेवा (श्रमिक रेल्वे वगळता)

– चित्रपटगृहे, नाट्यगृह, जिम

या बाबी सुरू राहतील… 

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने

– इतर दुकानांसाठी दुकानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७

– हॉटेल्स आणि रेस्टॉरंट १०० टक्के क्षमतेसह सुरू

– होम डिलेव्हरीला प्राधान्य

– शासकीय कार्यालयांत अधिकाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती

– इतर कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थिती

– जिल्ह्याबाहेर जाण्यास ई- पासची गरज नाही

– खासगी बस, मिनी बस व इतर वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू

– टॅक्सीमध्ये चालक व तीन प्रवाशांना परवानगी

– रिक्षामध्ये चालक व दोन प्रवासी हवेत

– चारचाकीत चालक व तीन प्रवाशांना परवानगी

Leave A Reply

Your email address will not be published.