पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू

0

अमळनेर : तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता घडली. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी की, लोंढवे येथील रहिवासी असणारे हितेश पवार,भावेश देसले व जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र खोल पाण्यात पोहता न आल्यामुळे भावेश देसले आणि हितेश पवार हे दोघे बुडाले. दरम्यान, त्यांच्यासोबत असणारा जयवंत पाटील हा पाण्यात न उतरल्यामुळे बचावला. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत हा गलितगात्र झाला. थरथरत्या अंगाने आणि कापºया आवाजाने त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. यानंतर गावातील मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनीटात बाहेर काढले.  दोघांच्या कुटुंबियांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना मृतावस्थेत पाहुन तेथेच हंभरडा फोडला. या घटनेने गाव सुन्न झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.