कॉलेज उघडण्यासंदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने घेतलाय ‘हा’ निर्णय!

0

जळगाव : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदीचा कालावधी ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला आहे. दरम्यान यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीसर संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. मात्र विद्यापीठ व महाविद्यालयात मर्यादित कर्मचारी दैनंदिन कामासाठी आळीपाळीने उपस्थित राहतील.

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठातंर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्‍ह्‍यातील महाविद्यालय संस्‍था संलग्‍नित आहेत. देशात कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्‍याने यंदाचे शैक्षणिक धोरण बदलले आहे. शाळा, महाविद्यालय सुरू करण्याबाबत अनिश्‍चितता  असून, आता विद्यापीठाने देखील महाविद्यालय उघडण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांनी आज (ता.३१) परीपत्रक निर्गमित केले असून त्यामध्ये ३१ ऑगस्टपर्यंत राज्य शासनाच्या निर्देशानुसार टाळेबंदीचा कालावधी वाढविला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांनी या काळात घरी राहून काम करावे असे या परीपत्रकात नमूद केले आहे. तसेच याकाळात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ती कार्यालयीन कामे करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाईन कामावर भर
शिक्षक व संशोधकांनी ऑनलाईन कंटेन्ट विकसित करणे, ऑनलाईन अध्यापन व मूल्यमापन, पुढील शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेखा संदर्भात कार्यवाही करणे, प्रश्नसंच तयार करणे, नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करणे तसेच शिक्षकांनी उत्‍तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे व जाहिर करणे, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे कामकाज करणे, आयक्युएसी संदर्भातील कामे करणे आदींसाठी हा काळ उपयोगात आणावा असे या परीपत्रकात नमूद करण्यात आले असून अत्यावश्यक सेवा यातून वगळण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.