गुड न्यूज : देशात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

0

नवी दिल्ली : जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यातच यावर जगभरातून शेकडो संशोधक लस शोधण्याचे काम करत आहेत. दरम्यान, यात ऑक्सफर्डची लस ही सर्वात अग्रस्थानी असल्याचे दिसत आहे. त्यातच आता भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनी ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’ला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितले होते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

ऑक्सफर्डच्या या लसीने आतापर्यंत चांगली प्रगती केली आहे. तसेच ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरूवाती निकाल उत्तम आहेत. तसेच ही लस सुरक्षितही आहे अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलने आपल्या अहवालात दिली आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरूवातीच्या चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद असल्याचे म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.