चिनी सैन्य गलवान खोऱ्यातून मागे हटण्यास सुरुवात

0

लडाख । भारत आणि चीन सीमावादावर मोठी घडामोड आज समोर आली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपलं सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. माहितीनुसार चिनी सैन्यानं 1.5 ते 2 किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग प्वाईंट 14 च्या मागे घेतले आहेत.  भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

पेट्रोलिंग प्वाईंट 14 ही तिच जागा आहे जिथं 15-16 जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत. दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंटवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत सैन्य सध्याच्या ठिकाणावरुन मागे हटलं आहे. तणाव निवळण्यासाठी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्यात येणार आहे.

चीनने गलवानमध्येच नव्हे तर हॉटस्प्रिंग, पँगाँग टीएसओ भागातही घुसखोरी केली आहे. इथे फिंगर फोरपर्यंत चिनी सैन्य आहे. हा संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत भारतीय सैन्य फिंगर आठ पर्यंत गस्त घालायचे. त्यामुळे चिनी सैन्याने फिंगर आठपर्यंत माघारी फिरावे ही भारताची मुख्य मागणी आहे. चीनच्या दबावाच्याखेळीसमोर न झुकता भारताने चीनला लागून असलेल्या ३ हजार ४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य तैनाती केली आहे. गलवानमध्ये चीनच्या कुठल्याही आगळीकीला उत्तर देण्यासाठी भारताने टी-९० भीष्ण रणगाडेही तयार ठेवले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.