…म्हणून WHO चे पथक चीनला जाणार

0

न्यूयॉर्क : जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक पुढच्या आठवड्यात दाखल होणार आहे. या ठिकाणी हे पथक जाऊन करोनाचा प्रसार नेमका कुठून सुरु झाला ते तपासणार आहे. सध्याच्या घडीला चीन याबाबतची नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही हा निर्णय घेतला आहे असेही संघटनेने म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने चीनला हे सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते की, करोनाची उत्पत्ती आणि प्रसार नेमका कसा झाला ते आम्हाला सांगा. मात्र चीनकडून समाधानकारक उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनच्या दौऱ्यावर जाणार असून हे पथकच करोनाचा प्रसार नेमका कसा सुरु झाला याचा शोध घेणार आहे.

वुहान हे करोनाचे केंद्र आहे असे चीनने सांगितले मात्र याची लागण नेमकी मानवाला कशी झाली ते पुरेसे स्पष्ट केले नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी जानेवारी महिन्यातच हे स्पष्ट केले होते की लवकरात लवकर चीनने या रोगाच्या उत्पत्ती आणि प्रसाराची माहिती द्यावी… जेणेकरुन या रोगाचा जगभरातला प्रसार रोखता येईल. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे आता या संघटनेचे एक पथक पुढील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे.

कोरोनामुळे जगभरात ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. तसेच या संख्येत दिवसेंदिवस भरही पडते आहे. दरम्यान पुढील आठवड्यात जो दौरा जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकातर्फे केला जाणार आहे त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पुढील आठवड्यात जे पथक दौरा करणार आहे त्यात आम्ही या विषाणूचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरुन याचा मुकाबला कसा करायचा याबाबत काही माहिती मिळेल अशी आशा आम्हाला आहे. सध्या आम्ही चीन सरकारच्या संपर्कात आहोत. प्राण्यातून हा विषाणू माणसामध्ये कसा आला याचा शोध आम्ही घेणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.