कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा

0

नवी दिल्ली । कोरोनाची सौम्य किंवा कोणतीही दृश्य लक्षणे नसलेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घरातच विलगीकरणात राहून उपचार घेण्याच्या दिशानिर्देशांमध्ये बदल केले आहेत. देशभरात करोनाचा उद्रेक वाढतच चालला असून पहिल्यांदाच २० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडल्याची गेल्या २४ तासात नोंद करण्यात आली. करोना रुग्णांची संख्या आता सव्वा सहा लाख झाली असून गेल्या सात दिवसांपासून सातत्याने १८ हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे.

सौम्य किंवा कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहून उपचार घेता येईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हमीपत्रावर स्वाक्षरी करुन रुग्ण घरी राहूनच आपला उपचार सुरू करू शकतो. मात्र, घरात स्वय विलगीकरण आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना वेगळे राहण्याची सुविधा असली पाहिजे. मात्र, एचआयव्ही, रोपणाची शस्त्रक्रिया झालेले, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ही सुविधा मिळणार नाही. त्याचप्रमाणे उच्चरक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या रुग्णांना योग्य वैद्यकीय मूल्यमापनानंतरच घरच्या विलगीकरणाची परवानगी मिळेल.

स्वयं विलगीकरणात नेहमी तिहेरी पदरांचा मास्क घालणे अनिवार्य आहे. हा मास्क दर आठ तासांनंतर किंवा खराब झाल्यानंतर बदलायचा आहे.बदलण्यापूर्वी या मास्कचे १ टक्का सोडियम हायड्रोक्लोराइडने निर्जंतुकीकरण केले नाही, तर याच मास्कच्या माध्यमातून करोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो. हातांना साबणाच्या पाण्याने कमीत कमी ४० सेकंदांपर्यंत धुवायचे आहे. करोना लक्षणे असलेला रुग्ण घरातील वयोवृद्ध किंवा गंभीर आजाराने ग्रासलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संपर्कात यायला नको आणि त्याने आपल्याच खोलीत राहणे आवश्यक आहे. रुग्णासोबत एक सुश्रुषा करणारी व्यक्ती २४ तास उपलब्ध असायला हवी. ही व्यक्ती जिल्हा निगराणी अधिकाऱ्याला २४ तास माहिती देत राहील. सुश्रुषा करणारी व्यक्ती आणि रुग्णाच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेल्या सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन प्रोफिलॅक्सिस घेणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.