जिल्हाधिका-यांवरील आरोप धांदात चुकीचे ; माजी आमदार सानंदा

0

खामगाव :- बुलडाणा येथील शिस्तप्रिय आणि कर्तव्यतत्पर अधिकारी असलेल्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या भ्रष्टाचाराला खतपाणी घालित नाहीत. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी त्यांच्यावर द्वेषभावनेने आरोप केले आहेत. हे आरोप फुंडकरांची राजकीय अपरिपक्वता सिध्द करणारे असल्याचे, माजी आमदार तथा काँग्रेस नेते दिलीपकुमार सानंदा यांनी म्हटले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सानंदा यांनी नमूद केले की, सुमनचंद्रा यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील भ्रष्टाचाराला पायबंद बसला. त्यांच्या कर्तव्य तत्परतेनेच नजिकच्या अकोला आणि जळगाव खान्देश जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असतानाही जिल्ह्यातील कोरोना आजार नियंत्रित आहे. त्यामुळे आकाश फुंडकर यांनी केलेले आरोप निकालास खोटे असून, ३१ मार्चनंतर निधी परत गेला. हा निधी परत आणण्याची धमक फुंडकरांमध्ये नाही. राजकीय दृष्ट्या ते अकार्यक्षम आहेत. जिल्ह्यातील कर्तव्य तत्पर अधिकारी जिल्हाधिका-यांसोबत असून कामचुकार अधिका-यांना त्यांचे वर्चस्व सहन होत नाही.

दरम्यान, अनलॉक कालावधीत शासकीय इमारतीचा दुरूपयोग करीत पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी फुंडकरांवर गुन्हा दाखल करावा. फुंडकरांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे पत्रकार परिषदेत खंडन करण्यात येईल, असेही सानंदांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.