देशातील कोरोना संसर्ग थांबेना ! २४ तासांत १९,१४८ रूग्णांची नोंद

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. कारण गेल्या २४ तासांमध्ये १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिसरभरात ४३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४ हजार ६४१ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात १९ हजार १४८ करोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे ११ हजार ८८१ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार १ जुलै पर्यंत एकूण ९० लाख ५६ हजार १७३ नमूने तपासले असल्याची माहिती दिली. यापैकी २ लाख २९ हजार ५५८ नमून्यांची चाचणी बुधवारी करण्यात आली. गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ६० टक्क्यांवर पोहोचले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगभरात आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत ५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.