लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

0

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्यावर मंडळाच्या बैठकीत एकमत झाले आहे. “यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार नाही,” असं सांगत लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. श्री गणेश मूर्तीची स्थापनाच होणार नसल्यामुळे यंदा लालबागचा राजाच्या दर्शनाला कोट्यवधी भाविकांना मुकावं लागणार आहे.

११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. सध्या महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर असतानाच राज्यासमोर असणारे करोनाचे संकट लक्षात घेता मंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनला येतात. करोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

नवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते.  अनेक वर्षांपासून राजाची १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं राबवण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.