आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचे स्वागत असहकार आंदोलन तूर्त स्थगित

0

अमळनेर (प्रतिनिधी):- आपला जिवाची पर्वा न करता कोरोनाचे काम अग्रभागी राहून करणाऱ्या स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसह अन्य मागण्या सोडविण्यासाठी दि.३ जुलै पासून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी असहकार आंदोलन आयोजित केले होते.

सदर असहकार आंदोलनाची शासनाने दखल घेत दि.२५ जुन रोजी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दोन हजार तर गटप्रवर्तकांच्या मानधनात तिन हजार दरमहा वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आणि मानधनवाढीसाठी १७०/-कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.श्री.राजेशजी टोपे यांनी प्रसार माध्यमातून जाहीर केले.

या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेने स्वागत केले असून दि.३ जुलै पासून होणारे असहकार आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.असे असले तरी आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत, दि.१६ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासकीय आदेशानुसार आशा व गटप्रवर्तक यांना पूर्वलक्षीप्रभावाने मानधनवाढ लागू करून तात्काळ थकीत रक्कम अदा करावी. यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात आंदोलने तसेच पाठपुरावा सुरूच ठेवतील.

कोरोनाच्या काळात गेल्या तिन महिन्यापासून योध्दा प्रमाणे करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांनी मानधन वाढीबाबात समाधान व्यक्त केले असून शासनाच्या समान किमान कार्यक्रमानुसार आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात आणखी वाढ करावी.अशी अपेक्षा आहे.

मानधनवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील घरोघरांत आरोग्य सेवा देणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका व ३५०० गटप्रवर्तक यांना लाभ होणार आहे. म्हणून या निर्णयाचे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर,कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, सरचिटणीस अँड.गजानन थळे, उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांच्यासह सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे, सुमंत कदम, दत्तात्रय जगताप यांनी स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.