महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ; काय सुरु काय बंद?

0

मुंबई । राज्यात ‘ मिशन बिगिन अगेन ‘चा दुसरा टप्पा ३१ जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून या दरम्यान अनेक निर्बंध मात्र टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार आहेत. एकंदर आणखी एक महिना राज्यातील जनतेला टाळेबंदीतच काढावा लागणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (28 जून) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी राज्यात हळूहळू शिथिलता आणली जाईल असं त्यांनी जनतेला संबोधित करत असताना म्हटलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा राज्यात सुरु झाला आहे. यामुळे राज्यात ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.

‘या’ गोष्टींना परवानगी
सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.
केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही.
लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.
केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

‘या’ गोष्टी बंधनकारक
1. मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य
2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक
3. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी
4. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही
5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध
6. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना
सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाजे यासारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात.
दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी.
मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी देण्यात आली आहे.

1. अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
2. इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री)
3. आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री
4. औद्योगिक कामे
5. खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे
6. होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचन
7. ऑनलाईन/दूरशिक्षण
8. सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
9. सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2
दुचाकी – केवळ चालक
10. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत. (Maharashtra Lockdown Extension Till 31 July)
11. एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा प्रवास. खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही
12. लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मेळावा मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉलमध्ये घेण्यास परवानगी
13. सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
14. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
15. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात
16. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
17. जिल्हांतर्गत बस सेवा 50 टक्के प्रवाशांसह

Leave A Reply

Your email address will not be published.