दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान

0

श्रीनगर । दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असेलल्या बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ३ जवान जखमी झाले आहेत. या बरोबरच या हल्ल्याच एका स्थानिक लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथे चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. या भागात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरक्षादलांनी हाती घेतले आहे. सध्या बिजबेहरा येथे चकमक सुरू असून सुरक्षा दलाचे जवान देखील दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ९० बटालियनवर हल्ला केला. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दहशतवादी दुचाकीवरुन आले होते. यावेळी त्यांनी सीआरपीएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, जवानांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि १२ वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचं निधन झालं.

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील सुरक्षा दलांचे अभियान तीव्र गतीने सुरू आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार फक्त दक्षिण काश्मीर भागात जून महिन्यात आतापर्यंत एकूण १२ चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत एकूण ३३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा दल सतत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहेत. या वर्षात आतापर्यंत १०३ दहशतवादी ठार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.