राजकारणातील जुनी खाट कुरकुरू लागली ; सेनेची काँग्रेसवर टीका

0

मुंबई :  महाविकास आघाडीतील सुरू असलेली धुसफूस हळूहळू दिसायला लागली आहे. शिवसेनेनं आज प्रथमच सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. राजकारणातील जुनी खाट कुरकुरू लागली आहे,’ अशी टिप्पणी शिवसेनेनं मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ठाकरे सरकारमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नाराजीची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसचे नेते लवकरच हे गाऱ्हाणं मांडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे.

काँग्रेस पक्षाचे सरकारमध्ये बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी असली तरी तिला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे,’ असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दे:
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणे तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. ‘सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका, असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री त्यांचे म्हणणे ऐकतील व निर्णय घेतील. थोरात व चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत व त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र असा दांडगा अनुभव शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर व कुरबुर होताना दिसत नाही, हे काँग्रेसनं लक्षात घ्यायला हवं.

Leave A Reply

Your email address will not be published.