गुड न्यूज ! करोना लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वी ; चीनमधील कंपनीचा दावा

0

बीजिंग: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे जवळपास ४ लाख लोकांचा बळी गेला आहे. याच परिस्थितीमध्ये अनेक देशात कोरोना विषाणूची लस शोधण्यासाठीचे प्रयत्न शर्थीने सुरु आहेत. अनेक देशांतील कंपन्यांनी लसींचे किंवा औषधांचे पहिल्या टप्प्यातील प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान, करोनामुळे होणाऱ्या आजाराला अटकाव करणाऱ्या लसीची क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली असल्याचा दावा  चीनमधील सिनोवॅक बायोटेक कंपनीने केला आहे. वुहान इन्स्टिट्यूट आणि पेइचिंग इन्सिट्यूट लस उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्लांटचा विस्तार करत आहेत.

सिनोवॅक बायोटेक कंपनीने म्हटले की, या लस चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम सकारात्मक आले आहेत. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या लसीच्या चाचणीसाठी १८ ते ५९ दरम्यानच्या ७४३ आरोग्य स्वयंसेवकांनी आपली नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात १४३ जणांचा पहिल्या टप्प्यात समावेश होता. तर, दुसऱ्या टप्प्यात ६०० जणांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना दोन इंजेक्शन देण्यात आले होते. त्यांच्यावर १४ दिवसांपर्यंत कोणतेही दुष्पपरिणाम दिसले नाहीत. या चाचणीच्या दोन्ही टप्प्यांतील चाचणीचे अहवाल आणि तिसऱ्या चाचणीच्या अभ्यासाबाबतची माहिती संबंधित सरकारी विभागाकडे सोपवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिनोवॅक कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ वेइदोंग यिन यांनी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीनुसार, ही लस सुरक्षित असून रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासूनच या कंपनीने लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. सध्या जगभरात जवळपास १२ हून अधिक कंपन्यांचे लस विकसित करण्याचे प्रयत्न निर्णायक टप्प्यावर आले आहेत. येत्या एक दोन महिन्यात काही कंपन्यांच्या लस चाचणीचे परिणाम जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.