जेष्ठांची कुणी दखल घेईल का?

0

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन सुरू ठेवले आहे. सक्तीचे लॉकडाऊन असणे गरजेचेच होते ,किंबहूना अजूनही आहेच.या लॉकडाऊन दरम्यान दवाखाने,औषधीची दुकाने सुरू होते, ते आवश्यक होतेच.या दरम्यानच्या काळात सर्वांनी समाज्यातील जेष्ठ नागरिकांची ‘आदेशानुसार’ असलेली काळजी घेतली.जेष्ठांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून घरातील इतरांनी त्यांना घरातच ठेवले.
या दरम्यानच्या काळात जेष्ठांच्या इतर व्याधीसाठी मात्र त्यांना बाहेर पडणे गरजेचे होते.खेड्यापाड्यातून तालुक्याला येणे,तेथून जिल्ह्याच्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांकडे येणे म्हणजे एकप्रकारे खडतर परीक्षाच होती.गाडी-घोडी नाही,खाजगी गाडी करून यायचं म्हणजे दुप्पट भाडे. त्यात उपचारासाठी साठविलेले पैसे यातच खर्च,म्हणजे आजाराच्या दुखण्यापेक्षा उपचार कठीण असे झाले.जेष्ठांच्या नेहमीच्या आजारांसाठी चे उपचार कठीण होत गेले.शासनाने ऑनलाईन उपचार ची परवानगी दिली खरी परंतु अशा पद्धतीच्या उपचाराला मर्यादा असते.मधुमेह,रक्तदाब,
थायरॉईड,
स्पॉंडीलॉसिस सारख्या वयोमानानुसार असणाऱ्या जुनाट व्याधी,महिलांच्या अश्याच काही व्याधी,मोतीबिंदू मुळे आलेले अंधत्व,चाळीशी नंतर प्रत्येकाला आवश्यक असलेला चसमा यासाठी सर्व रुग्णांना कष्ट पडत आहेत.चाळीशी नंतरचा चसमा हा बदलत असतो.लॉकडाऊनच्या या काळात डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश होते त्यानूसार जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञांची दवाखाने सुरू होतीच.वाहनांची सुविधा नसल्याने रुग्ण संख्या तशी कमीच होती.येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मात्र चसमा बदलवून देणाची गरज होती. डॉक्टर तसा चष्म्याचा नंबर लिहून देखील देत होते ,परंतु चष्म्याचे दुकान मात्र औषधींचा दुकानासारखे सुरू नव्हते.त्यामुळे खटाटोप करून आलेल्या वयोवृद्धांना चष्म्याविनाच घरी जावे लागले.वयोवृद्धांना चसमा अत्यंत गरजेचे असतो. त्यांच्या या वयात सर्वांनी साथ सोडली तरी चालते ,परंतु चष्म्याविना त्यांचे जीवन अधुरे असते कारण या वयात वाचन ,लिखाण किंवा दूरदर्शन बघणे या त्यांच्या आवडत्या गोष्टी असतात.आणि त्यादेखील या लॉकडाऊन च्या काळात त्यांच्या पासून हिरावून घेतल्या गेल्या.
कोरोनाचे भीतीदायक संकट, मृत्यू ची भीती,बाहेर फिरण्यास मज्जाव आणि त्यात चष्म्याअभावी दिसण्यासाठीची होणारी मोठी अडचण याबाबी जेष्ठांच्या मानसिक आरोग्यसाठी नक्कीच घातक ठरल्या.बऱ्याच नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यक असूनही भीतीपोटी जिल्ह्याठिकाणी येणे अवघड झाले.चष्म्याचे दुकान आदेश नसल्याने बंद होते ,आजकाल काही दुकान सुरू झालीत मात्र बहुतांश दुकाने ,चष्म्याचे होलसेल दुकाने व्यापारी संकुलात असल्याने आजही बंदच आहेत.बऱ्याच रुग्णांना लागणाऱ्या चष्म्याच्या नंबरच्या काचा अशाही सहज मिळत नाही ,लॉकडाऊन च्या काळात चष्म्याच्या काचांचे कारखाने देखील बंद होती.आता काही कारखाने सुरू देखील झालीत परंतु बरीच चष्म्याची दुकाने, होलसेल ची दुकाने बंद असल्याने चष्म्याच्या कारखांदारांचा रोजचा जमा-खर्च जुळणारा नसल्याने तेही बंद असल्यासारखेच आहेत.रुग्णसेवेसाठी काही लोक मुंबईहून काचा मागवीत आहेत परंतु स्थानिक पातळीपेक्षा त्या काचा नक्कीच महाग असणार तेव्हा तो भुर्दंडही वयोवृद्धांनाच भोगावा लागणार आहे. लॉकडाऊनच्या आधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या वयोवृद्धांना चष्म्याचा नंबर डॉक्टरांकडून लिहून दिला जात आहे मात्र त्यांना चसमा मिळू शकत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.नवीन मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी ,कुरिअर सेवा बंद असल्याने आवश्यक तो लेन्स मिळू शकत नाही. या पलीकडेही जेष्ठांना आपणच सांगतोय की कोरोना पासून दूर राहण्यासाठी घरातच राहा ,बाहेर पडू नका.एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे अंधःकार जीवन या कचाट्यात वयोवृद्ध अडकले आहेत. या जेष्ठांची कुणी दखल घेईल का?यांचे दुःख,वेदना कुणी समजून घेईन का?कुणीतरी त्यांची दखल घ्यावी ,त्यांच्याकडे लक्ष द्यावे अशी या जेष्ठांची नक्कीच इच्छा असेल.या जेष्ठांना डॉक्टर म्हणून सेवा देण्यास नेत्ररोगतज्ञ तयार आहेतच त्यासोबतच कायद्याने त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या बाबी दूर करून चष्म्याची सर्व दुकाने आणि इतर तत्सम अडथडे दूर करावे.

डॉ.धर्मेंद्र पाटील,
नेत्ररोगतज्ञ, जळगाव
मो. ९४२३१८७४८६

Leave A Reply

Your email address will not be published.