नवी दिल्ली: राज्यसभेच्या 18 जगांसाठी 19 जून रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 26 मार्चला होणार होती. मात्र, करोनाच्या फैलावामुळे ही निवडणूक पुढे ढकलली गेली होती. आज या निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले.
राज्यसभेतील 18 जागांपैकी आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4 जागा आहेत. झारखंडमध्ये 2, मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रत्येकी 3 आणि मणिपूर, मेघालयात प्रत्येकी 1 जागा आहे. या निवडणुकीची मतमोजणी 19 जून रोजीच संध्याकाळी केली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला राज्यसभेतील 57 जागा रिक्त झाल्या होत्या आणि 37 सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. या 37 सदस्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा शपथविधी अद्याप होणे बाकी आहे.