स्वत:च्या सुरक्षेसाठी स्वत:वर स्वयंनियंत्रण लादणे आवश्यक

0

कोरोना विषाणूंनी सर्वत्र थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यात झपाट्याने त्याचा फैलाव होतो आहे. अवघ्या तीन दिवसात जिल्ह्यात 165 रुग्ण वाढले. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आतापर्यंत 68 दिवसांचे चार लॉकडाऊन झाले आता 1 जूनपासून ते 30 जूनपर्यंत अनलॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत होणार आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत.  त्या त्या ठिकाणी लॉकडाऊन राहणार आहे. त्या भागातील जनतेला लॉकडाऊनचे पालन करण्याची सक्ती राहील. फक्त जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदी व्यतिरिक्त त्या भागातील लोकांना बाहेर पडता येणार नाही. 25 मार्च पासून 31 मे पर्यंतच्या घोषित 4 लॉकडाऊनमधील 68 दिवसांचा कालावधी आता जनतेच्या अंगवळणी पडलेला आहे. तरी सुद्धा अनेकवेळा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आपण पाहिलाय. अनलॉकडाऊन जाहीर झाले म्हणजे सर्व व्यवहार मुक्तपणे करू शकतो असे नव्हे. तर शासनाच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे प्रत्येकाला पालन करणे बंधनकारक राहणार आहे. लॉकडाऊन असतांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला. कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढतच राहिली.

शासनाने अनलॉक डाऊनमध्ये काही बंधने लादली असली तरी त्यापेक्षा जास्त जबाबदारी आता प्रत्येकाचीच राहणार आहे. 1 जुनपासून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आता पासची गरज राहणार नाही. संचारबंदी सुद्ध रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंतच राहणार आहे. गर्दीच्या समारंभावर बंदी राहणार आहे. विवाह सोहळा करायचाच तर 50 जणांच्या उपस्थितीत करावा लागेल. अंत्यविधीसाठी फक्त 20  लोकच असतील. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दारू पिणे, पान- गुटखा, तंबाखू यावर बंदी राहील. घरातूनच काम करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने वर्क फ्रॉम होमला चालना देण्याचा प्रयत्न राहणार आहे. कार्यालय आणि दुकानांच्या वेळा वेगवेगळ्या राहतील. कार्यालयात थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी लागणार आहे. वृद्ध आणि मुलांना विनाकारणघराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पहाटे पाच नंतर घराबाहेर मॉनिंग वॉकला जाता येईल. आजारी व्यक्ती गर्भवती महिला यांनी घरातच राहिले पाहिजे अशा सूचना जरी शासनाने जारी केल्या असल्या तरी त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येकाची राहील. कारण स्वत:ची सुरक्षा स्वत:वर स्वयंनियंत्रण घालून घेतली पाहिजे त्यामध्ये जनतेचेच हित आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जळगाव शहरात 50 प्रतिबंधित क्षेत्रासह लॉकडाऊन जिल्ह्यातील 138 प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन कायम राहणार आहे. प्रतिबंधित ीत्रासाठी लॉकडाऊन असणे जनतेच्याच हिताचे आहे. प्रतिबंधित क्षेत्रात कोरोनाला लवकर हद्दपार करायचे असेल तर लॉकडाऊन व्यतिरिक्त स्वयंसंचारबंदी कडकपणे लागू करावी म्हणजे कोरोनातून मुक्त होता येईल. संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बंद झाले तर आपोआप कोरोनाचा संसर्ग कमी होईल.

शहरातील प्रतिबंधित भाग
जळगाव शहरातील मेहरूण, सालार नगर, जोशी पेठ, मारोती पेठ, समता नगर, सम्राट कॉलनी, नेहरू नगर, पवननगर, गोपाळपुरा, जुने जळगाव, मोहाडी रोड, सिंधी कॉलनी, शाहू नगर, खंडेराव नगर, महाबळ रोड, श्रीधर नगर, नवल कॉलनी, तांबापुरा, शांतीनगर, गेंदालाल मिल परिसर टी.एम. नगर, आर. आर. विद्यालयाजवळ, पिंप्राळा, सुप्रिम कॉलनी, दक्षता नगर, एमआयडीसी, वाघ नगर, पोलिस मुख्यालय, शिवाजी नगर, खोटेनगर, कंजरवाडा, कोळी वाडा, डहाके नगर, आशाबाबा नगर, कासमवाडी, ढाकेवाडी याचा समावेश आहे. तर तालुक्यातील सावखेडा, तरसोद, विटनेर, जळगाव खुर्द, भोकर, नशिराबाद, शिरसोली, कुसूंबा, उमाळा यांचा समावेश आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी स्वत:वर बंधने घालून घेतली पाहिजेत घराबाहेर न पडणे त्याचबरोबर कोरोनाबाधिताचा अथवा संशयित रुग्णाचा स्वॅबचा अहवाल येण्याआधी मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीसाठी गर्दी व्हायला नको प्रश्न भावनेचा असला तरी कोरोनाचा शिरकाव व्हायला त्यामुळे मदतरूप होणार आहे. म्हणून हे पथ्य पाळावे अन्यथा भडगावला जे झाले ते अन्यत्र व्हायला वेळ लागणार नाही. कोरोनाची लागण झाल्यास अथवा लक्षणे दिसल्यासते लपवून न ठेवता डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेतले पाहिजे. आपण हा आजार अंगावर काढला तर आपल्यापासून इतरांना त्याची लागण होऊ शकते. तसेच जास्त कालावधीनंतर आपण दवाखाना गाठला तर आपल्यावर मृत्यूही ओढवतो, जळगाव जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा दर जास्त असण्याच हे एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना या महामारीला हद्दपार करायचे अपल्याच हातात आहे. त्याल घाबरायचे नाही घरात राहून प्रतिकार शक्ती वाढवू शकता. या सर्व बाबींचे योग्यरित्या पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाला हद्दपार करू शकतो.

आरोग्य यंत्रणेत सुधारणा हवी !
जळगाव शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित तसेच कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जळगावसह जिल्ह्यात कोवीड रुग्णालये आणि कोवीड सेंटर्सची निर्मिती केलेली आहे. तथापी कोवीड रुग्णलयातील व्यवस्था तसेच तेथील उपचाराच्या सेवेत सुधारणा होणे आवश्यक आहे. अलिकडे कोवीड रुग्णालयातील व्यवस्थेस अथवा तेथील गलथान कारभारासंदर्भात तक्रारीत वाढ झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण अथवा संशयित रुग्ण कोवीड हॉस्पीटलमध्यें जाण्यास तयार होत नाही. जिल्हा प्रशासनाने या आरोग्य यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत हीच अपेक्षा

– चांगभलं
धों. ज. गुरव 

Leave A Reply

Your email address will not be published.