करोनावरील औषध शोधण्यास देशात 30 गट कार्यरत

0

नवी दिल्ली – करोना विषाणूवर औषध शोधण्यासाठी देशातील 30 गट कार्यरत आहेत. त्यामध्ये उद्योजक आणि वैयक्तिक शिक्षकांचाही समावेश आहे, असे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के.विजय राघवन यांनी आज सांगितले. या 30 पैकी 20 जण चांगल्या वेगाने काम करीत आहेत, असे ते म्हणाले.

मोठे उद्योग ते वैयक्तिक शिक्षणतज्ज्ञ असे देशातील सुमारे 30 गट कॉविड -19 शी लढा देण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यातील 20 जणाची गती चांगली आहे, असे विजय राघवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लस करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोणत्याही घटकाचे नाव न घेता ते म्हणाले की काही जणांचे संशोधन क्‍लिनिकलपूर्व अवस्थेत आहे आणि ऑक्‍टोबरपर्यंत ते क्‍लिनिकल टप्प्यात पोहोचू शकतात. लस विकासासाठी सध्या सुमारे 10 वर्षे लागतात आणि त्यासाठी अंदाजे 200-300 दशलक्ष डॉलर खर्च होतो, परंतु एका वर्षात करोना विषाणूसाठी लस शोधणे हे जगभरासमोरचे उद्दिष्ट आहे. परंतु यासाठी समांतर प्रक्रिया आवश्‍यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

एका लसीवर काम करून ती लस कार्य करते की नाही हे दहा वर्षांच्या कालावधीसाठी पाहण्याऐवजी आपल्याला 100 लसीं विकसित करण्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. जग एकाच वेळी 100 हून अधिक लसींवर गुंतवणूक करीत आहे. संपूर्ण प्रक्रियेवर आता 2 ते 3 अब्ज डॉलर खर्च होतील.

सायंटिफिक ऍन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च आणि एआयसीटीई यांनीही एक औषध तयार करण्यास सुरुवात केली आहे. लस शोधताना गुणवत्तेचा विचार न करता नियामक प्रक्रियेतून पुढे जाणे देखील आवश्‍यक आहे. ही लस विकासित करण्यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहेत.

सर्वांना ही लस उपलब्ध करुन देण्याचे मोठे आव्हान असेल कारण सर्वात असुरक्षित भागाला त्याची सर्वाधिक आवश्‍यकता असेल. हे एक मोठे आव्हान आहे. अशी लस बनवण्याचे प्रयोग अनेकदा अयशस्वी होतात, असेही विजय राघवन म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.