ग्रामीण भागातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर तातडीने नियंत्रण हवे !

0

– चांगभलं 

धों ज गुरव

कोरोनाच्या विषाणूंनी संपूर्ण जळगाव जिल्ह्याला विळखा घातलाय. जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड हे दोन तालुके वगळता इतर तेरा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दुपारपर्यंत कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील संख्या 508 इतकी झालेली होती. त्यामध्ये 59 रुग्णांचा मृत्यू झाला असून समाधानाची बाब म्हणजे 198 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. 235 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार चालू आहे. भुसावळ, जळगाव आणि अमळनेर हे तालुके कोरोना हॉटस्पॉट बनले असून भुसावळ तालुक्यात 119, जळगाव 117 व अमळनेरमध्ये 113 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

दाट वस्ती असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतोय हे जरी खरे असले तरी ग्रामीण भागात सुद्धा तितक्याच झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. जळगाव तालुक्यातील तरसोद, विटनेर, जळगाव खुर्द, भोकर आणि नशिराबाद येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
आढळत्याने खळबळ उडाली आहे. जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळले आहे. भडगाव तालुक्यातील वडजी येथे आजच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला. या आधी भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील आढळलेले दोन कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. भडगाव तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 54 इतकी झाली आहे. रावेर तालुक्यातील निंभोरा सीम, सावदा येथे तसेच फैजपूर येथील कोरोना रुग्णांमुळे ह्या भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रावेर तालुक्यातील रुग्ण संख्या 10 वर पोहोचली आहे. अमळनेर तालुका सुरवातीला हॉटस्पॉट बनला होता. परंतू या तालुक्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळविले आहे. अमळनेर तालुक्यातील 113 कोरोना रुग्णांपैकी 95 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून आता फक्त 6 रुग्ण उपचार घेत आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे पोझिटीव्ह रुग्ण आढळताच नशिराबादवासियांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला. सकाळी 10 वाजल्यानंतर कडक अंमलबजावणी केल्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट होता.
तरसोद गावातही तातडीने नाकाबंदी करण्यात आली. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात तरसोद येथील जागृत गणेश मंदीर भाविकांसाठी पूर्णपणे बंद आहे. लॉकडाऊनच्या काळात गणेश भक्तांनी चतुर्थीला तरसोदला न जाता घरातच गणेश चतुर्थी साधे पणाने साजरी केली.
भडगावला अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे एकमेव कारण म्हणजे संशयित वृद्ध रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी हे कारणीभूत ठरले. कारण त्या मृत संशयिताचे स्वॅब चा अहवाल पोझिटीव्ह प्राप्त झाला. त्यामुळे ही चूक आता प्रशासन यापुढे होऊ देणार नाही. ग्रामीण भागातील लोकभावनिक असतात. त्या भावनेतून संसर्गाला बळी पडतात. म्हणून ग्रामीण भागात कोरोना संदर्भातील जनजागृती महत्वाची ठरते. त्यासाठी अनेक जण स्वच्छेने पुढे होऊन जनजागृतीचे काम करीत आहेत. या सर्वांना कोरोना योद्धा म्हणूनच संबोधण्यात येते.

लोकप्रतिनिधींचा पुढाकार
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींचा कोरोना जनजागृती करण्यात प्रभाव ठरु शकतो. रावेर-यावल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळताच आ.शिरीष चौधरी यांनी पुढाकार घेऊन जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पाचोरा तालुक्यात आ. किशोरआप्पा पाटील यांचे चांगले मार्गदर्शन होतेय.अमळनेर तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले असतांना कोरोना मुक्ततेकडे अमळनेर तालुक्याची वाटचाल सुरु आहे. आ.अनिल भाईदास पाटील, माजी आ.साहेबराव पाटील, शिरीषदादा चौधरी यांनी घेतलेले परिश्रम महत्वाचे आहेत.

अधीष्ठातापदाचा वाद संपला
जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रिकाम्या असलेल्या अधीष्ठातापदाचा वाद अखेर मिटला. तीन दिवसानंतर पुन्हा मूळचे अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्याकडे तो चार्ज मिळाला असल्याने जो घोळ होता तो संपला. आता अधीष्ठाता डॉ.भास्कर खैरे आणि जिल्हा शल्यचिकित्क डॉ.एन.एस.चव्हाण हे आपसात समन्वय साधून जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालतील तसेच कोरोना रुग्णांच्या मृत्यूच प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी योग्य उपाय योजना करतील ही अपेक्षा.

कोरोना युद्धांना बळ द्या
जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार करुन त्यांचा जीव वाचविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारे डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार तसेच लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येकांने सहकार्य करावे….

Leave A Reply

Your email address will not be published.