जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांचेत समन्वय आवश्यक

0

कोरोनाच्या प्रादुर्भावाने जळगाव शहर आणि जिल्ह्याला विळखा घातलाय. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 445 वर पोहोचली आहे. त्यात 50 जणांचा मृत्यू झालाय. समाधानाची बाब म्हणजे 195 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत. एकूण 205 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात व सेन्टरमध्ये उपचार चालू आहे. कोरोना रुग्ण, मृत, बरे झालेले आणि उपचार चालू असलेल्या संख्येवर दृष्टीक्षेप टाकला तर कोरोना बाधित रुग्णांवर तसेच संशयित रुग्णांवर होत असलेला उपचार योग्यरीतीने होतोय, त्यात कसलीही त्रुटी दिसून येत नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या सर्व डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांचेकडून एकनिष्ठेने सेवा दिली जातेय. त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कोरोनाचा रुग्ण बरे व्हावेत म्हणून ते जिवापाड मेहनत घेत आहेत. त्यामुळे कोरोनातून मुक्त होणार्‍या रुग्णांची जिल्ह्यातील टक्केवारी 41.5 इतकी आहे. परंतु मृत्यूचा दर नियंत्रणात आणणेबाबत मात्र अद्याप यश आलेले नाही. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 11.5  टक्के म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील वैद्यकिय यंत्रणेमध्ये सूसुत्रता आहेच परंतु ती सूसूत्रता आणि दृढ करण्यासाठी आणि गतीमानता वाढविण्यासाठी वरिष्ठ वैद्यकिय अधिकार्‍यात समन्वय असणे आवश्यक आहे त्यांच्यात समन्वय नसेल यंत्रणेत काम करणार्‍यांवर त्याचा परिणाम होतो जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण आणि शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांचेतील बेबनाव खमगंग चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळेच की काय डॉ. खैरे यांची उचलबांगडी झाली असे सांगण्यात येते त्यांचे ठिकाणी कोल्हापूर येथील अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये या बदलून येत आहेत. अर्थात वरिष्ठ पातळीवरच्या बदल्या या प्रशासनाला घ्याव्या लागतात. त्यातलाच तो एक भाग असला तरी जळगाव जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे येणार्‍या अधीष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचेसाठी आव्हानच ठरणार आहे. त्या ज्या ठिकाणाहून येत आहेत. त्या कोल्हापूरमध्येही कोरोनाचा प्रादुर्भावि असल्याने त्याची माहिती, जाणीव त्यांना आहेच. परंतु कोरोना नियंत्रणाच्या संदर्भात त्या आपला ठसा कसा उमटवतात यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जिल्हा शल्यकित्सक डॉ. चव्हाण आणि अधीष्ठाता डॉ. गजभिये यांचेवरील समन्वय कसा दृढ होतो हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना हाताळते आहे त्याबाबत ते कितपत समरस होतात किंवा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून हातात हात घालून एकदिलाने कसे सहकार्य करतात ह्यालाही तितकेच महत्वाचे आहे.

शासकीय सेवेतील 235 डॉक्टर्स हे रजेवर आहेत. कोरोना महामारीसारख्या आपत्तीच्या काळात रजेवर जाणे गैर आहे. अशावेळी त्यांची रजा मंजूर करणे सुद्धा तीतकेच गैर आहे. त्यांची रजा कोणी, कशी मंजूर केली हा एक वादाचा प्रश्न आहे. या 235 डॉक्टरांच्या रजेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. विविध पातळ्यांवर त्याबाबत तक्रारी गेलेल्या आहेत त्यामुळे डॉ. गजभिये या 235 डॉक्टरांचा प्रश्न कसा हाताळतात हे एक त्यांचेसमोर आव्हानच आहे. कारण खाजगी डॉक्टरांना कोरोना सेवा देण्याची सक्ती केली जाते तेव्हा हे 235 डॉक्टर्स सरकारचे जावाई आहेत का? अनेक डॉक्टर्स, परिचारिका यांची कोरोना रुग्णालयात सक्तीने बदली करण्यात येणे मग या 235 डॉक्टरांना रजेची  सवलत कशासाठी ?

जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुका हा कोरोना हॉटस्पॉट बनले होते. 106 रुग्णांची संख्या होती तथापि अमळनेरकरांनी दाखवलेली जागृकता आणि घेतलेली मेहनत त्यांच्या कामी आली. 106 रुग्णांपैकी आज 90 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. अमळनेर तालुक्याची ऑरेंज झोनमध्ये एन्ट्री झाली आहे. लॉकडाऊन असतांना सात सात दिवस स्वत: जनता कर्फ्य लादून घेतला. औषधी खरेदी करण्याव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडणार नाही याची सक्ती स्वत: प्रत्येकाने लादून घेतली. कोरोना रुग्ण आढळला कि त्याच्या संपर्कात आलेल्याची तपासणी करणे, त्याच्या परिसरातील नागरिकांची तपासणी करणे, सर्व्हे करणे आणि रुग्ण शोधून काढणे हे एकच काम अमळनेरकरांनी केले म्हणूनच त्यांनी आज सुटकेचा श्वास सोडला आहे. जळगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव आदि कोरोनाचे बाधित रुग्ण असलेल्या ठिकाणी सुद्धा कोरोना रोखणे शक्य आहे. प्रशासन सर्व काही उपाय योजना करतेच प्रशासनाला जनतेची साथ हवी आहे. त्यासाठी गरज असेल तरच  घराबाहेर पडा, तोंडाला मास्क लावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे आणि गर्दीत जाणे टाळले तर आपणही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो एवढे मात्र निश्चित.

 

Leave A Reply

Your email address will not be published.