गुड न्यूज! अमेरिकेतून कोरोना’वरील पहिल्या लसीला यशाचे संकेत

0

न्यूयॉर्क : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच  अमेरिकेतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोविड19 विषाणूवरील लसीच्या चाचणीचे प्राथमिक निकाल आशादायक असल्याचा दावा ‘मॉडर्ना’ बायोटेक्नॉलॉजीकल कंपनीने सोमवारी केला. मॉडर्नाने तयार केलेल्या लसीचा डोस आतापर्यंत आठ जणांना देण्यात आला आहे. त्यानंतर या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद वाढल्याचे दिसले. त्यामुळे जगात ‘कोरोना’वरील पहिली लस सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मॉडर्ना कंपनीच्या दाव्यानुसार पहिल्यांदाच ‘कोरोना’ विषाणूची लस सुरक्षित असल्याचे दिसते. आठ निरोगी व्यक्तींना लसी देण्यात आल्या असून त्यांचे निकाल आशादायक आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला लसीचे दोन डोस दिले गेले. मार्च महिन्यात ही चाचणी सुरु झाली होती, अशी माहिती मॉडर्ना कंपनीने दिली.

मॉडर्ना ही आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी करणारी पहिली औषध कंपनी आहे. कंपनीचा तिसरा टप्पा यशस्वी झाला तर कंपनी लस बनवण्यासाठी अर्ज करु शकते.

चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात 600 जणांचा समावेश असेल, असे मॉडर्नाने सांगितले. तर जुलै महिन्यात तिसऱ्या टप्प्यात हजारो जणांना समाविष्ट केले जाईल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॉडर्नाला चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्याची मान्यता दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.