हप्ता भरण्यास आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ शक्‍य!

0

मुंबई-केंद्र सरकारने देशपातळीवरील लॉक डाऊनची कालमर्यादा 31 मे पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहारावर परिणाम होणार आहे. या बाबीचा विचार करून रिझर्व बॅंक कर्जाचा हप्ता देण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची शक्‍यता आहे.

रविवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापन संस्थेने लॉक डाऊनची मुदत 31 मे पर्यंत वाढविली आहे. पहिले लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी जाहीर केले होते. त्याची मुदत 21 दिवस होती. त्यानंतर ते 3 मेपर्यंत वाढविण्यात आले. त्यात पुन्हा 17 मेपर्यंत वाढ करण्यात आली. या बाबीचा विचार करून मार्च महिन्यामध्ये रिझर्व बॅंकेने टर्म लोनवरील कर्जाचा हप्ता देण्यास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

आता लॉक डाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे रिझर्व बॅंक कर्जाचा हप्ता देण्यासाठी पुन्हा 3 महिन्याची मुदतवाढ देण्याची शक्‍यता असल्याचे स्टेट बॅंकेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. याचा अर्थ जर रिझर्व बॅंकेने पुन्हा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी 3 महिन्याची मुदतवाढ दिली तर कंपन्यांना आणि नागरिकांना कर्जाचा हप्ता 31 ऑगस्ट 2020 पर्यंत द्यावा लागणार नाही.

त्याचबरोबर त्यानंतरही कंपन्या फारशी परतफेड करू शकणार नाहीत. त्या अवस्थेत व्याज न दिल्यास सप्टेंबरनंतर कंपन्यांची खाती अनुत्पादक म्हणून जाहीर होण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे या कर्जाची फेररचना करण्याची गरज निर्माण होणार आहे. रिझर्व बॅंक त्यावर योग्य वेळी निर्णय घेईल असे या अहवालात म्हटले आहे. खेळत्या भांडवलासाठी दिलेले कर्ज हे करोना व्हायरससंबंधातील दिलेल्या कर्जात समाविष्ट आहे का नाही याचे स्पष्टीकरण रिझर्व बॅंकेने करण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

याअगोदर रिझर्व बॅंकेने कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्याचा निर्णय ग्राहकांनी घ्यावा असे सांगितले होते. ज्या ग्राहकांनी कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्याची मागणी केली होती त्या ग्राहकांना कर्जाचा हप्ता पुढे टाकण्याची सवलत दिली होती. मात्र ज्यांनी कर्जाचे हप्ते भरले आहेत ते बॅंकांनी स्विकारले आहेत. मात्र लॉक डाऊन वाढले असल्यामुळे आगामी काळात बरेच नागरिकांनी व कंपन्या या योजनेचा लाभ घेण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.