अमळनेर व पाचोऱ्याच्या धर्तीवर जळगाव, भुसावळमध्ये थ्री लेअर पध्दतीचा अवलंब करा : जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांचे निर्देश

0

अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तींच्याही संपर्कात आलेल्यांचा शोध (थ्री लेअर पध्दत) घेऊन त्यांचे स्वॅबचे नमुने तपासण्यात आले त्याच धर्तीवर जळगाव, भुसावळच्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पध्दत वापरा. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी आज संबंधित यंत्रणेला दिलेत.
जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ ढाकणे पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा लवकरच सुरु होणार असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर व पाचोऱ्यात ज्याप्रमाणे काम करण्यात आले त्या धर्तीवर जळगाव व भुसावळमध्ये तपासणी मोहिम प्राधान्याने राबवावी. याकरीता कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्कमधील व लोरिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घ्यावा. लोरिस्कमधील व्यक्तीमध्ये लक्षणे असल्यास त्यांचेही स्वॅब घेऊन तपासणीस पाठवावे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक यांनी गावातील नागरीकांमध्ये कोरोना बाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे तंतोतंत पालन झाले पाहिजे यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
त्याचबरोबर जिल्ह्यातील कापूस विक्रीसाठी सीसीआय मार्फत केंद्र सुरु करण्यात येत आहे. याठिकाणी प्रत्येक दिवशी किमान 50 शेतकऱ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर टोकन देऊन त्यांचे कापूस खरेदी करावी. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घेतल्याशिवाय केंद्र बंद करु नये. तसेच मका व ज्वारी खरेदीसाठी केंद्र सुरु करण्यात येणार त्याठिकाणी शेतकऱ्यांना अडचणी येवू नये तसेच व्यापारी मालाची कटाई जास्त करणार नाही याकरीता सहकार व पणन विभागाने प्रत्येक तालुक्याच्या सहकार अधिकाऱ्यास उपस्थित राहून तपासणी करण्याचेही निर्देश दिले.

यावेळी जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात व राज्यात जाणारे व येणारे मजूर, नागरीक तसेच बेघर, गरजू व गरीबांना अन्न वेळेवर मिळेल याबाबतचाही त्यांनी आढावा घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.