कोरोना योद्धांना सलाम

0

जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. रुग्णांची संख्या २९७ इतकी झाली असून पैकी 33 जणांच मृत्यू झाला. मृत्यू दराची संख्या चिंता वाढविणारी आहे. तो दर नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्रात सर्वाधिक साडेबारा टक्के जळगाव जिल्ह्याचा मृत्यू दर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत लॉकडाऊनचे तीन पर्व झाले. 51 दिवसाच्या या लॉकडाऊन नंतर आता 31 मे पर्यंत चौथे पर्व सुरु झाले आहे. तसा अध्यादेशही जारी झाला. गेल्या 51 दिवसांपासून कोरोनाला रोखण्यास अनेक पातळीवरून प्रयत्न होताहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीसाठी तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करण्यासाठी आमच्या पोलिस यंत्रणेची रात्रंदिवस सेवा सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर तसेच कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य विभागातील डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांनी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस सेवा देत आहेत. आरोग्य यंत्रणेसाठी लागणार्‍या सुविधांच्या अभावामुळे सुरुवातीला फार मोठा अडथळा निर्माण झाला होता. उदाहरणार्थ पीपीई कीटस्, मास्क, सॅनीटायझर्सची असलेल्या कमतरतेमुळे रुग्णांच्या उपचारात अडथळा येत होता. परंतु अनेक सार्वजनिक संस्था, व्यक्ती पुढे सरसावल्या आणि ही कमतरता दूर झाली. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांची, परिचारिकांची, वॉर्डबॉय आदिच्या सुरक्षेची समस्या दूर झाली. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या हजारोच्या पोटाचा प्रश्न बिकट बनला. अनेक जणांवर उपसमारीची वेळ आली. तथापि अनेक संस्था, व्यक्तींकडून त्यांच्या पोटा-पाण्याचा प्रश्न सोडवला गेला. अनेक गरजू- गरीब कुटूंबांना किराणा वस्तुचे वाटप केले. ज्यांना काहीच नाही त्यांच्यासाठी दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. अशा अनेक व्यक्ती आणि संस्थांची यादी घ्यायची म्हटली तर ती भली मोठी होईल. परंतु कोरोनाच्या या महामारीत त्यांचे योगदान मोठे आहे. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीला आर्थिक सहाय्य केले. अनेकांनी आपला वाढदिवस साजरा न करता ती रक्कम मुख्यमंत्री निधीला दिली. थाटामाटात विवाह करण्याऐवजी साध्या पद्धतीने विवाह करून त्यातून उरलेला पैसा मदत म्हणून दिली. कोरोना संदर्भात वैयक्तिक जनजागृती केली. चित्रकाराने चित्रांच्या माध्यमातून आपली सेवा देताहेत. कलाकारांनी कलेच्या माध्यमातून कोरोनाविषयी महिती पटवून देताहेत. सर्व प्रकारची प्रसिद्धी माध्यमे सुद्धा कोरोनाविषयी सकारात्मक वृत्ते देऊन कोरोनाचा होणारा संसर्ग रोखणेत सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे सर्वस्तरावरून या कोरोना महामारीला रोखण्यासाठी, त्याचा पराभव करण्यासाठी हे योद्धे युद्धच लढताहेत. त्या सर्वांना दै. लोकशाही परिवारातर्फे सलाम.

कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. त्याला संपविण्यासाठी ही लढाई निरंतरपणे चालू ठेवावी लागेल. तसेच कोरोनाशी मुकाबला करतांना आपल्यात एकवाक्यता असणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनावर वचक हवा. राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही. माजी मंत्रीद्वय एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांना राजकारणाचा तसेच प्रशासनासंदर्भाचा अनुभव आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हावा. विद्यमान पालकमंत्री अनुभवाने कमी पडत असतील तर त्यांना आपण सूचना करून समस्या सोडवाव्यात. परंतु तसा समन्वय राजकीय पक्षात दिसून येत नाही. कारण पालकमंत्री फक्त बैठकापुरते दिसतात अशी एकनाथराव खडसेंनी केलेली टीका तसेच गिरीश महाजन यांची उपचार पद्धतीबाबत केलेली टीका. यावरून राजकीय पक्षात मतभेद असल्याचे जाणवते. ही वेळ राजकारण करण्याची नाही तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटलांनीसुद्धा प्रतिष्ठेचा प्रश्न करण्याऐवजी सर्वांना एकत्र घेऊन काम केल्यास कोरोनाच्य समस्या सुटू शकतात. त्यासाठी योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ दोन अधिकार्‍यात म्हणजे डीन आणि सीएस यांच्यात जर बेबनाव असेल तर तो दूर झाला पाहिजे. दोन वरिष्ठ अधिकार्‍यात जर समन्वय नसेल तर त्यांच्या हाताखालील काम करण्यांनी काय आदर्श घ्यावा. शेवटी त्याचा परिणाम एकूण कामावर होतो. ही वैयक्तिक हेवेदावे करण्याची नव्हे कुणाचे चुकत असेल तर त्यांना वेळीच त्याची जाणीव करून द्या आणि त्याउपरही ऐकत नसतील तर योग्य ती कारवाई करा. परंतु वरिष्ठ दोन अधिकार्‍यातील बेबनाव कदापि बडदास्त केले जाणार नाही याची जाणीव झालीच पाहिजे. अन्यथा याचा फायदा इतर घटक घेतील आणि ते कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अडथळा आणतील. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी ज्या व्यक्ती, संस्था सहकार्य करतात त्यांचेही मानसिक खच्चीकरण होईल हे नाकारता येणार नाही.

धों.ज.गुरव
सल्लागार संपादक 

Leave A Reply

Your email address will not be published.