…ही तर नाथाभाऊंना संपविण्याचीच खेळी !

0

सध्या देशात आणि जगात कोरोना या महामारीचा विषय चर्चेचा असला तरी महाराष्ट्रात मात्र कोरोनाबरोबरच भाजप आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यातील वादाच्या खमंग चर्चेला उत आलाय. भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाथाभाऊ संतप्त होऊन नेहमीप्रमाणे पक्ष नेतृत्वावर आगपाखड करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत  मुक्ताईनगर मतदारसंघातून नाथाभाऊंना तिकिट नाकारून त्यांची मुलगी रोहिणी खडसेला देण्यात आले. त्याचवेळी भाजपने नाथाभाऊंचा सक्रिय राजकारणाचा पत्ता कट करण्याची खेळी केली. त्यातच मुलगी रोहिणीचा विधान सभेत पराभव झाला कि केला? तो भाजपच्या पथ्यावर पडला. रोहिणीच्या पराभवावरही नाथाभाऊ ंनी रान उठविले परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर गोपीनाथ गडावर पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत नाथाभाऊंनी पक्षनेतृत्वाचे वाभाडे काढले. तरी सुद्धा भाजपच्यावतीने खडसेंसंदर्भात कसलेही टीका – टिप्पणी करण्यात आली नाही. खडसे दिड वर्षातच कथित जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीपदावरून पायउतार झाले. त्यानंतर सहा महिन्याच्या आत चौकशी करून त्यांना मंत्रीमंडळात घेतले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सुतोवाच केले. खडसेंना मंत्री मंडळात तर घेतले गेले नाही. उलट त्यांचे विरुद्ध दाऊदच्या पत्नीशी झालेले कथित संवाद त्यांच्या स्वीय सहायकांचे कथित खंडणी प्रकरण आदि ससेमिरा लावण्यात आला. तब्बल साडेतीन वर्षात म्हणजे विधानसभेची मुदत संपेपर्यंत नाथाभाऊंचे पुनर्वसन केलेच नाही. दरम्यान नाथाभाऊंतर्फे वेळोवेळी भाजप नेतृत्वाकडून न्याय मिळत नाही म्हणून पक्षनेतृत्वाला लक्ष्य करून आपली व्यथा व्यक्त करीत होते. अगदी विधानसभेच्या सभागृहात सुद्धा माझ्यावरील गुन्हा सिद्ध करा अन्यथा मला निर्दोष असल्याचे जाहीर करा असे घणाघाती भाषण केले. परंतु भाजप पक्षनेतृत्वावर काहीही परिणाम झाला नाही. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून आज नाथाभाऊ आणि चंद्रकांत पाटील यांचेत जरी कलगीतुरा रंगलेला आपण पहातोय. परंतु नाथाभाऊंचे मंत्रीपद गेल्यानंतर त्यांचे महसूल खाते चंद्रकांत पाटलांकडे दिले गेले तेव्हा मी तर भरताची भूमिका बजावतोय. भरताने जसे रामाच्या पादुकाचे पूजने केले तसे मी नाथाभाऊंच्या पादुकांचे पूजन करतोय. खडसे मंत्रीपदावर विराजमान झाले की त्या पादुका त्यांचे सुपूर्द करणार असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांची भूमिका एकदम बदललेली दिसून येते. रामाची उपाधी देणाऱ्या खडसेंबाबत चंद्रकांत पाटील बदलले कसे? यामागचे एकमेव कारण म्हणजे ‘सत्ता’ हे होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सत्तेच्या वाटेत येणाऱ्या स्पर्धकाचा पद्धतशीरपणे काट्याने काटा काढला. त्यामुळे विधानसभेचे तिकिट नाकारले गेले तेव्हाच राज्याच्या राजकारणातून नाथाभाऊंचा पत्ता कट होणार हे असे वाटत होते आणि नेमके तसेच झाले.

विधानपरिषदेचे तिकिट कापल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी राज्यातील पक्षनेतृत्वावर विशेषत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचेवर हल्ला चढविला तिकिट तुम्हाला मिळणार असे सांगून पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला की केंद्रीय पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही तर आपण वेगळा विचार करू अशी निकराची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. परंतु केंद्रातील श्रेष्ठी राज्यातील नेत्यांच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेणार नाहीत हेही तितकेच खरे. त्यामुळे पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची नाथाभाऊंना कल्पना असेलच. कारण वरिष्ठांचा हिरवा कंदिल असल्याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी एकनाथराव खडसेविरोधात वक्तव्ये करणे शक्यच नाही. एकनाथराव खडसेंनी हरिभाऊ जावळे यांचे खासदारकीचे मिळालेले तिकीट कापून स्वत:च्या सुनेला तिकिट दिले तेव्हा खंजीर कुणी खुपसले असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला. इसकेच नव्हे तर पक्षाने फार काही दिले सुनेबरोबरच स्वत:च्या मुलीला तिकिट दिले. मुलालाही तिकिट दिले. पत्नी महानंदाच्या चेअरमन आहेत. मुलगी जिल्हा बँकेच्या चेअरमन आहेत. स्वत: नाथाभाऊ सातवेळा आमदार, दोन वेळा मंत्री ही पदे उपभोगली  त्यामुळे नाथाभाऊंनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला. याचा अर्थ आता आपण सक्रीय राजकारणापासून दूर राहा असाच होता. यावर नाथाभाऊंनी चंद्रकांत पाटलांना सडेतोड उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले. परंतु चंद्रकांत पाटील आणि नाथाभाऊ यांचे रंगलेला कलगीतुरा मात्र चांगलाच रंगला.

Leave A Reply

Your email address will not be published.