केल्याने होत आहे रे…आधी केलेची पाहिजे !

0

समर्थ रामदासांनी सांगितलेल्या या ओळींमधून सकारात्मक विचारांची अक्षय्य ऊर्जा निर्माण झालेली दिसून येते. जे कार्य सिद्धीस नेण्यासाठी वैचारिक आधाराची गरज असते, त्या कार्यपूर्तीच्या वेळी या सकारात्मक उर्जेचे महत्व अनन्यसाधारण असे असते.

प्रत्येक काळ्या ढगाआड एक सोनेरी किरण दडलेेला असतो. सुखाच्या शेल्याला दु:खाची भरजरी किनार आणि दु:खाच्या पाठीवर सुखाचा वार….. यालाच तर नीयती म्हणतात !! अशा वेळी आपल्याकडे दोनच पर्याय असतात, एक म्हणजे नीयतीने पुढ्यात जे जे वाढले असेल ते ते निमूटपणे स्विकारणे. साधारणपणे जे लोक नशीबाचे भोग म्हणत खितपत पडून राहतात त्यांच्यासाठी हा पर्याय लागू होतो आणि दुसरा म्हणजे अचाट संघर्ष करून नीयतीलाही हरवत ईष्ट वस्तू पदरात पाडून घेणे. ज्या लोकांचा कर्मावर अतोनात विश्वास आहे, ते लोक हा पर्याय निवडण्यास पसंती देतात. *स्वामी विवेकानंद म्हणतात, “तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात”.* आपल्या सर्वांनाच एक गोष्ट ठाऊक आहे की, नशीब तर त्यांचेही असते, ज्यांना हात नसतात.

आता येथे सर्वांनाच एक प्रश्न पडला असेल की, हे सारं सांगण्या मागचं प्रयोजन तरी काय? प्रयोजन आहे मित्रांनो !….. आज संपूर्ण जगाला कोविड-१९ नावाच्या आजाराने, अजगराच्या विळख्यात एखादे भक्ष्य सापडून त्याची जशी अवस्था व्हावी, त्याप्रमाणे जखडून टाकलेले आहे. जिवितहानी, वित्त हानी इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली आहे की, आपण कल्पना देखील करू शकत नाही. ह्या आजारावर विजय मिळविण्यासाठी शासन स्तरापासून व्यक्तिगत स्तरापर्यंत सर्व घटक आपापली आवश्यक भूमिका बजावत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने घेतलेले निर्णय आपल्या हिताचे असून त्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्यच नव्हे तर, नैतिक जबाबदारी देखील आहे. या लॉकडाऊनच्या काळात घरातच राहून स्वत:ला, आपल्या परिजनांना व पर्यायाने समाजाला सुरक्षित ठेवणे हे सर्वतोपरी आपल्याच हातात आहे. टाळी कधीही एका हाताने वाजत नसते. आपल्या एका चुकीमुळे शेकडो जीव धोक्यात येतील, याचे गांभीर्य लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

आपण साहित्याची सेवा करणारे उपासक आहोत. ज्या ज्या वेळी समाज भरकटत असतो, जेव्हा जेव्हा समाजात नैराश्य निर्माण होत असते, वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक मंदीतून ज्या ज्या वेळी समाजात आर्थिक अराजकता निर्माण होत असते, त्या त्या वेळी समाजाला योग्य दिशा दर्शविण्यासाठी, समाजात सकारात्मक विचारांची मुहूर्तमेढ करण्यासाठी, परस्पर सहकार्यातून आलेल्या आर्थिक संकटाशी मुकाबला करण्यासाठी समाजाभिमुख कार्य करणारे घटक, संस्था, संघटना नेहमीच पुढाकार घेत असतात. अशा वेळी एक साहित्यिक आपल्या सकारात्मक विचारांची ऊर्जा आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजात निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आलेला आहे. आताही काळाची तीच गरज आहे. समाजात स्थैर्य, उभारी निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता असलेली ही वेळ आहे.
आपण आपल्या उत्स्फूर्त लिखाणातून समाज मनावर सकारात्मक विचारांचे संस्कार करण्याचा यशस्वी प्रयत्न करणे आवश्यक आहे. “घरी रहा, सुरक्षित रहा”, “काळजी घ्या”, याशिवाय विविध चिन्ह संकेतांचा वापर करून “स्वच्छतेची आवश्यकता व महत्व” विषद करणे आवश्यक आहे. समाजाच्या पुनरुत्थानासाठी व प्रबोधनासाठी हाती घेतलेली ही मशाल आपल्याला हातोहात पुढे न्यावयाची आहे आणि समाजातील नैराश्य तिमिराला सकारात्मक ऊर्जेच्या अक्षय्य प्रकाशाने उजळून टाकायचे आहे. यासाठी आवश्यकता आहे ती आपल्या एकतेची आणि सहकार्याची !!…..
धन्यवाद !

– नरेंद्र पाटील

कवी / लेखक

Leave A Reply

Your email address will not be published.