खाजगी शिकवणी वर्गांची जीवघेणी स्पर्धा

0

चांगभल –

परवा मराठवाड्यातील लातूर येथील एका खाजगी क्लासच्या संचालकाची 20 लाख रुपयांची सुपारी देवून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. क्लासेसच्या व्यवसायीक स्पर्धेेतून झालेल्या या हत्येमुळे मन सुन्न होते. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात एक प्राध्यापक दुसर्‍या प्राध्यापकाचा सिनेस्टाईल काटा काढतो ही घटनाच मुळी लांच्छनास्पद आहे.
शिक्षणाकडे ज्या पवित्र दृष्टीकोनातून पहायला हवे तो दृष्टीकोन आता बदलत चाललाय. त्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणसंस्था या संस्थाचालकाच्या कमाईचे कुरण बनवताहेत. त्याला काही शिक्षणसंस्थांचा अपवाद असू शकतो. प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महविद्यालयातून मिळणार्‍या शिक्षणाबाबत जास्त न बोललेले बरे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना हवी असते. गुणांची चांगली टक्केवारी शाळा, महाविद्यालयातून मिळणार्‍या शिक्षणातून ते शक्य नाही असे विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना वाटते. परिणाम स्वरुप खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. शाळा व महाविद्यालयांना जणू खाजगी क्लासेस या समांतर संस्था बनलेल्या आहेत. खाजगी शिकवणी वर्गाची संख्या झपाट्याने वाढतेच. एकट्या जळगाव शहरात सुमारे 300 पेक्षा जास्त खाजगी शिकवणी वर्ग चालतात. जळगाव शहरातील अयोध्यानगर सारखा एखादा भाग घेतला तर तेथे 8 ते 10 पेक्षा जास्त खाजगी शिकवणी वर्गाचे फलक लागलेले दिसून येतात. प्रत्येक क्लासमध्ये विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असते. कारण शाळा – महाविद्यालयातील शिक्षणाने प्रमाणपत्र मिळतात परंतु चांगले गुण खाजगी क्लास लावल्याशिवाय मिळत नाहीत, अशी विद्यार्थ्यांबरोबर पालकांची धारणा झाली हे दुर्दैव होय. त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर खाजगी क्लासेसशिवाय शक्यच नाही असे त्यांना वाटते. म्हणून गलेलठ्ठ शुल्क देऊन खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थी प्रवेश घेताय. शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालयात शिक्षणासाठी विद्यार्थी नियमित जात नाहीत. परंतु खाजगी क्लासेसमध्ये मात्र नियमित जातात हे विशेष. त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथे नाईलाजास्तव जावे लागते. तरीसुद्धा खाजगी क्लासेसमधून प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या नगण्यच आहे. शाळा आणि महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी चांगली लागते. त्यामागचे खरे कारण शिकवणी वर्ग हे होय. परंतु 10 वी, 12 वी निकालाची अमूक इतकी टक्केवारी त्यानंतर पदवी परिक्षेचा निकाल अमूक इतका अशा जाहिराती करुन शिक्षणसंस्था चालकांनी आपल्या शाळेत, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास आकर्षित करतात. खाजगी शिक्षण संस्थांमध्ये संस्थाचालकांकडून शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंतन चाललेले असते. 100 वर्षांची परंपरा असलेल्या जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळात संस्थाचालकांच्या दोन गटात दंगल झाली तुफान दगडफेक हाणामारीत 3 जण जखमी झाले. दोन्ही गटातील 33 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नूतन मराठा महाविद्यालयात सिनेस्टाईल हाणामारी झाली. तेव्हा मोठा जमाव जमला होता. दोन्ही गटातर्फे एकमेकांवर परस्परात गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी स्वत: होऊन तिसरा गुन्हा दाखल केलाय. हे सर्व जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळ ही संस्था आपल्यास ताब्यात हवी, त्या संस्थेवर आपलेच वर्चस्व हवे यासाठी हा राडा झाला. जळगाव शहरात दुसरी एक संस्था इस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी या संस्थेला सुद्धा 100 वर्षांची परंपरा असून येथे शिक्षक विरुद्ध संस्थाचालक असा वाद सुरू आहे. संस्थाचालकांकडून शिक्षकांना वेठबिगारासारखे वागवले जाते असा शिक्षकांचा आरोप असून 15 जून रोजी ऐन शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी गावगुंडांकडून आर. आर. शाळेच्या प्रवेशद्वारावरच धक्काबुक्की करुन शाळेत जाण्यास मज्जाव केला प्रकरण पोलिसात गेले असून पोलीस तपास करताहेत.
नोंदणीकृत शिक्षण संस्थावर राज्याच्या शिक्षण खात्याचे नियंत्रण असते. तरीसुद्धा त्या संस्थात जे काही चाललेय त्यावर शिक्षण खाते काय करतेय हे कळत नाही. खाजगी शिकवणी वर्गावर तर कोणाचेच नियंत्रण नाही. जळगाव शहरात खाजगी क्लासेसचे जणू पेव फुटले आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे खाजगी शिक्षण संस्थाकडून चालविण्यात येणार्‍या शाळा- महाविद्यालयातून योग्यरित्या शिक्षण मिळत नाही. अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन अक्षरश: विद्यार्थ्यांची लूट चालू आहे. वारेमाप कमाई त्यातून होते. पैशाच्या जोरावर खाजगी क्लासेसच्या संचालकांची दादागिरी वाढतेय जळगाव शहरातील दर्जी क्लासेस मधीलच एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या घटनेने अख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. ती पिडीत विद्यार्थिनी मुंबईची असल्याने त्या घटनेला वेगळाच रंग दिला जात होता. तथापि आपसात हे प्रकरण मिटविले गेले. अशा प्रकारच्या घटना होत असल्या तरी त्या उजेडात येत नाहीत. म्हणून त्याचेबाबत उहापोह होत नाही. म्हणून शहरातील सर्व खाजगी क्लासेसची खानेसुमारी करुन त्यात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थी विद्यार्थिनींची यादी शिक्षण खात्याने घेतली पाहिजे. खाजगी क्लासेसचे वाढणारे पेव रोखायचे असेल त्यांचेवर शासनाने अंकुश असणे आवश्यक आहे. अन्यथा खाजगी क्लासेसमध्ये गुन्हेगारीचा होणारा शिरकाव रोखणे कठीण जाईल. इतकेच काय प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयात होणार्‍या बेकायदा बाबींवर अंकुश ठेवणे सध्या अवघड झाले आहे. भडगाव तालुक्यातील जि.प.च्या शाळेतील एक शिक्षकाने ऐन अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या दिवशी अंमली पदार्थाचे सेवन करुन शाळेत आला अन मुख्याध्यापकांना मारहाण केली ही मारहाण एकट्यात झाली तर समजू शकतो गावचे सरपंच, उपसरपंच आदी शाळेतील सर्व शिक्षक यांचेसमोर मुख्याध्यापकाच्या श्रीमुखात लगावली. हे सर्व पहाता पवित्र शिक्षण क्षेत्राला गालबोट लागणार्‍या घटनांना रोख लावावे एवढीच अपेक्षा.

Leave A Reply

Your email address will not be published.