नाथाभाऊ…उपद्रव्य मूल्य दाखवाच !

0

भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांनी महाराष्ट्रात शून्यातून पक्ष वाढवला, रूजवला त्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची पक्षाकडून सतत उपेक्षा होत आहे. भाजपसाठी खडसे म्हणजे गमतीचा विषय निर्माण केला जातोय. वेळोवेळी त्यांचे खच्चीकरण केले जातेय. राजकीय सत्तेच्या सारीपाटात एखाद्या चांगल्या नेतृत्वाची कशी कुचंबणा होतेय त्याचे उदाहरण म्हणजे एकनाथराव खडसे यांचे देता येईल. महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजप – सेनेची सत्ता स्थापन होण्यात नाथाभाऊंचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचे ते उमेदवार असल्याने मुख्यमंत्रीपदाची स्वप्नही त्यांनी बघितले. परंतु नेमके मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली तेच त्यांना महागात पडले. आणि पुढे मंत्रीपदावरून त्यांना पायऊतार व्हावे लागले. त्यानंतर नाथाभाऊंचा सत्तेतील वनवास सुरु झाला. एका अभ्यासू नेतृत्वाच्या खच्चीकरणाला सुरुवात झाली. अनेक ससेमिरा त्यांचे मागे लावण्यात आल्या. त्यातून ते सहीसलामत सुटले असतांना सुद्धा त्यांना सत्तेत सामावून घेतले गेले नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षातर्फे उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांच्या मुलीला मुक्ताईनगरमधून उमेदवारी दिली गेली. परंतु पक्षातील गटबाजीमुळे तिचारही पराभव झाला. पक्षातील कार्यकर्त्यांमुळेच रोहिणी खडसेंचा पराभव झाल्याचे नाथाभाऊंनी पक्ष नेतृत्वाकडे पुराव्यानिशी कैफियत मांडली. परंतु त्यांच्या कैफियतीची पक्ष नेतृत्वाकडून दखल घेतली नाही. पंकजा मुंडे – नथाभाऊ एका भव्य मेळाव्यात एकत्र आले तिथे नाथाभाऊंनी पक्षनेतृत्वाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण केले. त्यावेळी व्यासपीठावर खुद्द भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ही होते.  त्यावेळी नाथाभाऊ आपला स्वतंत्र घरोबा करतात असे सर्वांना वाटत होते. परंतु त्यावेळी त्यांचे बंड शमले. भाजपला ते  सोडचिठ्ठी देतील असे वाटत होते परंतु तसे काही झाले नाही. त्यानंतर सेना राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाविकास आघाडी स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी नाथाभाऊ हे उद्धव ठाकरेंना तसेच शरद पवारांना भेटल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले परंतु ती चर्चाही थंडावली. ती का थंडावली याचे नेमके कारण सांगता येणार नाही. त्यानंतर भाजपतर्फे नाथाभाऊंचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या. सत्ताधारी पक्षाला नामोहरम करणारा अभ्यासू नेता हवा म्हणून त्यांची विधान परिषदेत वर्णी लावून त्यांना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते हे पद देण्यात येईल असे सांगण्यात येऊ लागले.

दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेतेपदी प्रविण दरेकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेवर नाथाभाऊंना घेण्याचा विषय मागे पडला. एप्रिलमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर असलेल्या सात जागा रिक्त होत असल्याने 26 मार्चला राज्यसभेची निवडणूक घोषित झाली. एकूण सात जागापैकी भाजपच्या वाट्याला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला 2, काँग्रेस 1 आणि शिवसेनेच्या वाट्याला 1 जागा मिळणार असल्याने भाजपतर्फे दोन जागावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे पहिल्या यादीत जाहीर झाली. तिसर्‍या यादीत नाथाभाऊंचे नाव येईल अशी सर्वत्र चर्चा सुरु झाली. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा एकनाथराव खडसे यांचे नाव महाराष्ट्राकडून सूचविण्यात आल्याचे जाहीररित्या सांगितले. आज दुसरी यादी जाहीर झाली त्यात एकनाथराव खडसेंच्या नावा ऐवजी औरंगाबादचे कराड यांचे नाव जाहीर झाले नाथाभाऊंच्या पदरी पुन्हा निराशाच. एकतर नाथाभाऊंनी राज्यसभेची उमेदवारी पक्षाकडे मागितली नसतांना त्यांच्या नावाची पक्षातर्फेच चर्चेत आले. अशा प्रकारे त्यांच्या नावाची चर्चा करून नाथाभाऊंची जणू खिल्ली उडविण्याचाच प्रकार म्हणता येईल. शेवटी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोणते निर्णय घ्यावेत हा त्यांचा प्रश्न आहे. तथापि खान्देशातील बुलंद आवाज दाबला जातोय याची मात्र खंत म्हणावी लागेल. उत्तर महाराष्ट्रात विशेषत: जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊंनी विकासकामात आपला वेगळा ठसा निर्माण केलाय. पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. त्यांची अशा प्रकारे कुंचबना होतच राहिली तर नाथाभाऊंनी आता गप्प बसू नये अशी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची इच्छा असणे साहजिक आहे. नुकतेच मध्यप्रदेशात काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच ज्योतिरादित्य शिंद्यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांना घेऊन चांगले खाते दिले जाईल अशी चर्चा आहे. काँग्रेसपक्ष का सोडावा लागला याबाबत शिंदी यांनी खुमासदार तात्रिक मुद्दे भाषणात मांडले. शिंदीयांच्या या घटनेमुळे मध्यप्रदेश काँग्रेसला हादराच बसला. ज्योतिरादित्य शिंदीया यांनी आपले उपद्रव्य मूल्य कायम असते हे काँग्रेसला दाखवून दिले.

नाथाभाऊंचे नाव विविध पद्धतीने चर्चेत आणून त्यांची खिल्ली उडविली जातेय. त्याची किंमत पक्षाला मोजावी लागेल. त्यादृष्टीने नाथाभाऊंनी या खिल्ली उडविणार्‍यांची दातखिळी बसवावी असे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात वावगे काय?

Leave A Reply

Your email address will not be published.