वाळू माफियांच्या मुजोरीला जबाबदार कोण ?

0

माफिया हा शब्द महाराष्ट्रात देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. अवैध धंदे करणाऱ्यांना माफीये संबोधले जाते. वैध मार्गाने कोणत्याही व्यवसाय करायचा म्हटला कि त्या व्यवसायातून माफक नफ्याचे प्रमाण असते. परंतु अवैध मार्गाने व्यवसाय केला तर त्यांतून अल्पवधित आणि कमी श्रमात वारेमाप पैसा कमावता येतो. त्यामुळे रॉकेल माफीचे वाळू माफिये हे शब्द मोठ्या प्रमाणात सर्वांच्या तोंडात रूढ झाले. अवैध धंद्याला लगाम  लावण्यासाठी शासकीय पातळीवर यंत्रणा काम करते.

अवैध धंद्याला लगाम बसवायचे  असेल तर संबंधित यंत्रणेमार्फेत प्रामाणिकपणे कारवाई झाली तर अशक्यच असे काही नाही. परंतु संबंधित  विभागामार्फत प्रामाणिकपणे कारवाई होत नाही किंबहुना कारवाईत दिलाई होते. म्हणून या अवैध धंदेवाल्याचे फावते. त्यांची हिमंत वाढते  अमळनेर तालुक्यातील भरवस येथे अवैधरित्या गौणखनिज वाहणाऱ्या वाळूमाफियावर महसूल खात्यातील तलाठ्यांच्या पथकावर वाळू माफियांनी  हल्ला केला. त्यात तलाठी आशिष पारधी हे गंभीर जखमी झाले. वाळू माफियांनी तलाठी पथकावर दगडफेक करीत मारहाण  बुधवार दिनांक ४ मार्च रोजी हि घटना घडली.

घटनेनंतर अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्टेशनला तलाठी आशिष पारधी यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील बबलू राजेंद्र  तायडे त्यांच्यासह ९ जणांवर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. परंतु अद्याप हल्लेखोरांना अटक झालेली नाही . हल्लेखोरांना अटक होईपर्यंत गुरुवारी तलाठी संघटनेतर्फे या घटनेचा निषेध केला. त्यानंतर संघटनांतर्फे कामबंद आंदोलन सुरु केले आहे.  या कामबंद आंदोलनात तालुक्यातील एकूण ३८ तलाठी, ५ मंडळ अधिकारी, ४८ महसूल कर्मचारी सहभागी झाल्याने कामे ठप्प  झाली. त्याचा सर्व सामान्यांना फटका बसतोय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनि वाळू माफियांच्या मुसक्या आवळा असे आदेश दिले. परंतु या मुसक्या  आवळणार कोण ?दोन दिवस झाले गुन्हा दाखल होऊन परंतु अद्याप आरोपीना अटक झालेली नाही. आरोपींची नावे फिर्यादीने फिर्यादीत दिले असतांनासुध्दा आरोपी सापडत नाहीत यामागचे कारण काय ?महसूल आणि पोलीस खात्याने प्रामाणिकपणे ठरवले तर वाळूमाफियांच्या  मुसक्या आवळायला  वेळ लागणार नाही परंतु त्या मुसक्या का आवळल्या जात नाही यामागचे गौडबंगाल मात्र कळत नाही.

अवैध वाहतूक करणारे  वाहने जप्त करून जिल्हाधिकारी कार्यलयात ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातून  हि जप्त केलेली वाहने परस्पर चोरीस गेल्याच्या अजब प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाहने चोरून नेण्याची  वाळू माफियांची हिमंत होतेय कशी ?या प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोपी असली तरी तितकीच अवघड आहेत कारण फिर्यादीने जरी फिर्यादीत वाळू माफियांची नावे दिली असली तरी आमचे पोलीस खाते अनेक तांत्रिक कारणे पुढे करून खात्याची असमर्थता दर्शवतात अवैध वाळू वाहतूक करणारे  वाहन ज्याच्या नावावर आहे त्या मालकाला ताब्यात घेतले तर वाहन चोरी करणाऱ्यास तातडीने अटक होऊ शकते.  परंतु तसे होत नाही कारण वाळू माफियांचे हात फार दूरपर्यंत पोहचलेले आहे. त्यामुळे ते काहीही करू शकतात त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही म्हणून वाळू माफियांच्या मुसक्या आवळा अशा गोंडस घोषणेनें काहीही साध्य होणार नाही एक दोन दिवसानंतर आंदोलन करणाऱ्या संघटनेतर्फे आंदोलन मागे घेतले जाईल,पुन्हा येरे माझ्या मागल्या चालू राहिल यात शंका नाही.नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रॉकेल  माफियांना अवैध  रॉकेल साठयावर धाड टाकायला गेलेल्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळले. महाराष्ट्रात  नव्हे संपूर्ण  देशात हि घटना गाजली. उपजिल्हाधिकारी यांचा बळी गेला रॉकेल माफियांवर गुन्हा दाखल झाला पुढे जे व्हायचे ते झाले. अद्याप कोर्टबाजी  चालू आहे. कोणत्याही माफियांची हिमंत वाढायला त्यांचेवर कारवाई करणाऱ्या संबंधित यंत्रणेवरील दोष कारणीभूत आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही . त्यामुळे आपण वाळू माफियांच्या संदर्भात कितीही ओरड करीत असलो तरी वाळू माफियांची दादागिरी थांबणार नाही.  वाळू माफीचा मुसक्या आवळणार वगैरे शब्द आता गुळगुळीत झालेले आहेत.

त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची लागलेली कीड समूळ नष्ट होणे अशक्यप्राय आहे. माफियांच्या नावाने ओरड हि चालूच राहणार आहे  संबधीत कारवाई करणाऱ्या यंत्रणेलाही ते हवेच असते. कारण हे एक चक्रव्ह्यूव . अनेकवेळा अवैध धंद्यातील कारवाईतून अमुक एवढा महसूल मिळाला वगैरे बातम्या प्रस्तुत करून अधिकारी पाठ थोपटून घेतात. परंतु त्या महसूलपेक्षा कितीतरी पटीने ते शासनाला लुबाडतात  त्याचे  काय ?या प्रकाराचा गांभीर्याने विचार होईल असे वाटत नाही म्हणूनच म्हटले जाते कि सोपी गोष्ट अवघड झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.