जळगावसह जिल्ह्यातील विकास कामे रामभरोसे?

0

”चणे आहेत परंतु ते खायला दात नाहीत, दात आहेत परंतु खायला चणे नाहीत” अशी मराठीत म्हण आहे. जळगाव आणि जिल्ह्याच्या बाबतीत ही म्हण तंतोतंत लागू पडते. जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यास ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचापासून पं.स., जि.प. पदाधिकारी सदस्य, आमदार, खासदार आणि मंत्रीसुद्धा आले. किरकोळ कामाचे अथवा होऊ घातलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी नेहमीच अग्रेसर असतात. परंतु ठप्प विकास कामांबाबत अथवा संथगतीने सुरु असलेल्या कामांबाबत आमचे प्रतिनिधी काहीच बोलत नाहीत.

जळगाव शहरातून जाणार्‍या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. गेल्या 5 वर्षापासून महामार्गाला समांतर रस्ता करण्यासाठी जळगावकर रस्त्यावर उतरून आंदोलन केले दोन वर्षापासून चौपदरीकरणाला मंजूरी मिळाली. डीपीआरही मंजूर झाला. गेल्या वर्षभरापासून कासवगतीने त्याचे काम चालू आहे. या संथ कामांमुळे महामार्गाची अवस्था आणखी बिकट झालीय अपघात संख्येत वाढच होतेय. कुणाचा मुलगा, मुलगी, आई, वडील यांचा अपघातात बळी जाताय. परंतु कंत्राटदाराला पाझर फुटत नाही. कंत्राटदारांवर अंकुश ठेवणार्‍या अधिकार्‍यांची कंत्राटदारावर अंकुश ठेवू शकत नाही. त्यांच्यात पाणी कुठे मुरते हे कळायला मार्ग नाही. कंत्राटदार व अधिकार्‍यावर लोकप्रतिनिधी वचक असायला हवा पण तो राहिलेला नाही. म्हणून सर्व विकास कामे रामभरोसे चालले आहेत. जळगाव शहरातील खोटेनगरपासून ते कालिंका माता मंदिरापर्यंत 9 कि.मी. अंतराच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली. चौपदरीकरणाचे काम किती महिने चालणार हे मात्र कोणी सांगू शकत नाही. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. जळगाव लोकसभा मतदार संघाचे तरूण तडफदार खासदार यांच्याकडून जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु आपल्या खासदारकीच्या एक वर्षाच्या कारकीर्दीत त्यांच्या कर्तृत्वाची चुणूक मात्र दिसली नाही.

कासव गतीने चाललेल्या शहरातील चौपदरीकरणाबाबत ते काहीही बोलायला तयार नाहीत. या ऊलट पाळधी ते खोटेनगर आणि कालिंका माता ते तरसोद पर्यंत चौपदरीकरण करण्याच्या कामाचा प्रस्ताव आपण केंद्र शासनाला सादर करणार असल्याची बातमी मात्र वृत्तपत्राला देऊन आपण काहीतरी करतोय हे भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. खोटे नगर ते कालिंकामाता चौपदरीकरण कासवगतीने का सुरु आहे. त्याला गती देऊन ते विहित वेळेत करण्यासाठी मात्र खासदार महाशय काय करतात याबाबत मात्र एक ब्र बोलत नाहीत. यामागचे इंगित काय? हे कळायला मार्ग नाही. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गिरणा नदीतील बलून बंधारे, शेळगाव बॅरेज, पाडळसरे धरण मेगा रिचार्ज प्रकल्प यासंदर्भात फक्त घोषणा केल्या त्याचे तसूभरही काम सुरु झालेले नाही. जामनेर तालुक्यात टेक्सटाईल पार्क प्रकल्प सुरु करण्यात येत असल्याची घोषणा झाली. त्यासाठी 100 एकर जागाही असल्याचे सांगण्यात आले. तथापि त्या पार्कला मूर्त स्वरूप आलेले नाही. परिसरातील कापूस उत्पादक शेतकर्‍याच्या कापसाला चांगला भाव मिळेल. तरूणांना रोजगार उपलब्ध होईल असे गाजर पुढे करण्यात आले परंतु शेतकरी आणि बेरोजगार तरूण यांचा मात्र भ्रमनिरास झाला. गिरीश महाजनांच्या कारकिर्दीत वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाले ही एक जमेची बाजू म्हणता येईल. जामनेरचे टेक्सटाईल पार्क प्रकल्प आता मागे पडले. खा. उन्मेश पाटील म्हणतात देशातील दहापैकी एक टेक्सटाईल पार्क जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथे एक हजार एकरात साकारणार असल्याची माहिती दिली त्यात 30 हजारावर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या टेक्सटाईल पार्क संदर्भात कशात काय अन् फाटक्यात पाय अशी स्थिती असतांना आपण काहीतरी भव्य दिव्य काम करीत असल्याचा भास मात्र खासदार करताहेत. कारण प्रत्यक्षात या प्रकल्पाला मंजूरी मिळून प्रत्यक्ष त्याच्या कामाला प्रारंभ होईल तो सुदीन म्हणता येईल. म्हणून लोकप्रतिनिधींनी घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केले तर ते जनतेच्या हिताचे होईल.

बलून बंधारे जळगाव बॅरेज, पाडळसरे धरणाचे काय झाले ? त्याचा पाठपुरावा करून त्या संदर्भात काय स्थिती आहे हे जनतेसमोर ठेवावे. गेल्या 7-8 वर्षापासून फागणे ते चिखली या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जणू बंदच आहे. या संदर्भात खासदार उन्मेश पाटलांनी पुढाकार घेतला तर जास्त चांगले. त्याचबरोबर जळगाव- औरंगाबाद या 150 कि.मी. चौपदरीकरणाने तर कंत्राटदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची धिंडवडे काढली. वैतागलेल्या प्रवाशांच्या रेट्यामुळे अखेर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने तंबी दिल्यानंतर मात्र आता त्या कामाला गती आली आहे. जिल्ह्यातील विकास कामे प्रलंबित असल्याचे कारण काय? निधी नाही म्हणून कामे खोळंबून पडतात परंतु येथे निधी उपलब्ध असतांना ही विकास कामे का होत नाहीत ? यांचे जळगाव जिल्ह्यातील जनतेला कोण देणार ? जळगाव शहरातील विकास कामांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. शहर विकासावर स्वतंत्रपणे टिप्पणी करणार आहोत. परंतु चणे आहेत परंतु खायला दात नाहीत, दात आहेत तर खायला चणे नाहीत या म्हणीसारखी अवस्था निर्माण झाली आहे एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.