उत्तर महाराष्ट्रात भाजपा धक्के बसणार?

0

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दोन दिवसांचा जळगाव जिल्हा दौरा भाजपला धक्का देणारा ठरला असे म्हणता येईल. ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधात गोपीनाथ गडावरून टीकेची झोड उठविली. नाराज खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही खडसे यांनी भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दोन दिवशीय जळगाव जिल्हा दौरा महत्वाचा आणि चर्चेचा ठरला. या दौर्‍यात संजय सावंत यांनी एकनाथराव खडसे विषयी चांगले गुणगान गायीले. नाथाभाऊंसारखा अनुभवी, अभ्यासू नेता सेनेत आला तर त्याचा शिवसेनेला फायदाच होणार असे सूचक वक्तव्य पत्रकारांशी बोलतांना संजय सावंत यांनी केले. याचा अर्थ एकनाथराव खडसे यांचे सेना प्रवेशासंदर्भात जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांची मते जाणून घेतली.

संजय सावंत शिवसैनिकांबरोबरच जळगावचे भाजप आमदार आ. सुरेश उर्फ राजूमामा भोळे याही भेट घेतली. तसेच एकनाथराव खडसे यांचे समर्थक माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांचेशी बोलणी केली. भोळे आणि जगवानी यांच्या भेटीप्रसंगी जे बोलते झाले त्याचा तपशील कळू शकला नाही. तथापि नाथाभाऊंच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात त्यांची चाचपणी झाली असावी एवढे मात्र निश्चित. संजय सावंत यांच्या भेटी संदर्भात आ. राजूमामा भोळे यांनी केलेला खुलासा न पटण्याजोगा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. माझ्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांचीही मदत झालेली होती. त्या पार्श्वभूमिवर सावंतांना मी भेटलो असे राजूमामा भोळेंचे विधान हास्यास्पद वाटते. कारण महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आरूढ झाले. भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजप – शिवसेनेमध्ये आता विळ्या भोपळ्याचे नाते असतांना भाजपचे आमदार शिवसेनेच्या संपर्क प्रमुखाची भेट म्हणजे कुठेतरी पाल चुकचुकते असे म्हणायला वाव आहे.

जळगाव शहर मतदार संघातून आ. राजूमामा भोळे दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजप – सेनेची युती नव्हती माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेतर्फे निवडणूक लढविली होती. परंतु घरकूल घोटाळ्यात जेलमध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात त्यांना भाग घेता आला नव्हता. त्यामुळे आ. राजूमामा भोळे विजयी झाले होते. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती असल्यामुळे राजूमामाच्या विरोधात राष्ट्रवादीचा कमकुवत उमेदवार रिंगणात असल्याने 50 हजारापेक्षा जास्त मतांनी मामा निवडून आले. राजूमामा विषयी जळगावकरांची खदखद असतांनाही तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याने त्यांचा विजय झाला. आता युती फिसकटली, भाजपची सत्ता गेली. महाविकास आघाडीची सत्ता आली. जळगाव शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महापालिकेच्या महापौर पदी राजूमामाच्या धर्मपत्नी सीमा भोळे आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी राज्याकडून निधी हवा आहे. भाजपची सत्ता असती तर तो विकास निधी सहज मिळाला असता परंतु महाविकास आघाडीची  सत्ता येताच जळगाव महापालिकेचा न वापरलेला 100 कोटींचा निधी परत घेण्याचा निर्णय घेतला. जळगाव महापालिका कर्जाच्या बोजातून अद्याप पूर्णपणे मुक्त झालेली नाही. गाळेधारकांचा प्रश्न जटील बनलेला आहे. अमृत पाणी पुरवठा योजनेचे भिजत घोंगडे पडले आहे. शहरातील रस्त्यांची वाट लागलेली आहे. विकास कामे ठप्प झालेली आहेत. त्यामुळे आ. राजुमामा भोळे यांची अस्वस्थता वाढणे साहजिक आहे. त्यातच 2014 च्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकारामुळे राजुमामांना तिकीट मिळाले होते. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता आ. राजुमामा भोळे आणि संजय सावंत यांचेतील भेट महत्वपूर्ण म्हणावी लागेल. माजी आ. गुरुमुख जगवाणी आणि भुसावळचे आ. संजय सावकारे हे एकनाथराव खडसे यांचे समर्थक समजले जातात. त्यामुळे शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा जळगाव जिल्हा दौरा शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाचा झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजय सावंतांचा दौरा भाजपच्या गोतात खळबळ माजवणारा असाच म्हणावा लागेल. महाविकास आघाडीच्या सत्तेमुळे जिल्ह्यातील आगामी राजकारणाची समिकरणेच बदलणार आहेत. जळगाव जिल्हापरिषदेतील भाजपच्या सत्तेला सुरुंग लागेल. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नाथाभाऊ यांच्या युतीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी निवडले जातील. त्यामुळे भाजपला फार मोठा फटका बसणार आहे. जिल्ह्यात जिल्हा बँक, दूध विकास फेडरेशनची निवडणूक महाविकास आघाडी लढविणार असल्याचे संकेत संजय सावंत यांनी दिले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपला धक्के देण्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.