बंडखोरांना तंबी !

0

प्रधानमंत्री नद्र मोदी यांच्या जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करुन निवडणुक लढविणार्‍यांना चांगलीच तंबी दिली. बंडखोरांना कुणाचाही आशिर्वाद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजप- शिवसेनेची युती अभेद्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे मतदारांनी भाजपच्या कमळ आणि सेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच मतदान करण्याचे आवाहनही फडणवीसांनी केले असल्याने पक्षाचा छुपा आशिर्वाद असल्याचे सांगणार्‍या बंडखोरांना चांगलीच चपराक बसली आहे. त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते बंडखोरांचा उघड नव्हे तर आता छुपा प्रचारही करण्यास धजावणार नाही. त्याचबरोबर बंडखोरांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे भाजपचे संकटमोचक पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केल्याने बंडखोरी करणार्‍या भाजपच्या उमेदवारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघातील 4 शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपचे उमेदवारांनी बंडखोरी केली असून ते पक्षाचे झेंडे उघडउघड हातात घेऊन प्रचार करताहेत असा आरोप जळगाव ग्रामीण मतदार संघातील महायुतीचे सेना उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानाच्या जाहीर सभेच्या पूर्वी गिरीश महाजन यांचेकडे केला होता. प्रधानमंत्री महायुतीचे नेते असल्याने महायुतीचा उमेदवार म्हणून मी या सभेला आलोय या सभेत मला बोलण्याची संधी द्यावी असा आग्रह गुलाबराव पाटलांनी केला. त्यावेळी गिरीश महाजनांनी समयसुचकता बाळगून संतप्त गुलाबरावांना शांत केले. तसेच श्रोत्यांमध्ये जाऊन बसलेल्या गुलाबरावांना सन्मानाने व्यासपीठावर महाजनांनी बोलावून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बंडखोरांचा जाहीर समाचार घेतला. त्यामुळे बंडखोरांबरोबर प्रचारात भाग घेणार्‍या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. ज्यांना बंडखोरी करावयाची असेल त्यांनी अगोदर पक्षाचा राजीनामा द्यावा, पक्षाकडून मिळालेल्या पदाचा राजीनामा द्यावा मग खुशाल अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी. जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटलांविरुद्ध बंडखोरी करुन अपक्ष निवडणुक लढणा भाजपचे भुसावळ येथील नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी याआधी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या पत्नी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच त्यांच्या मातोश्री जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचेसह त्यांची पत्नी, मातोश्री यांची पदे धोक्यात आलेली आहेत. भाजपचे जिल्हा संघटक जळकेकर महाराज यांनीच फक्त आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. एकंदरीत भाजप पक्षातर्फे ज्यांच्याकडे पद आहे त्यांनी राजीनामा देणे ही नैतिक जबाबदारी येते. जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रृत आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाबरावांच्या विरोधात पी.सी. पाटील यांनी निवडणुक लढविली होती. त्यावेळी कमळ या भाजपच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविली असताना ते तिसर्‍या क्रमांकावर होते. त्यावेळी विशेष म्हणजे मोदी लाट जोरावर होती.
जिल्ह्यातील पाचोरा येथील महायुतीचे सेना उमेदवार किशोर आप्पा पाटील यांचे विरोधात भाजपाचे अमोद शिंदे यांनी बंडखोरी केलेली आहे. अमोद शिंदे हे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. अमोल शिंदे यांनी जेव्हा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा गिरीश महाजन यांनी त्यांचा अर्ज मागे घ्यायला लावतील असेच सर्वांना वाटत होते. परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज अमोल शिंदेंनी माघार तर घेतलाच नाही उलट अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करता दुसरा अपक्ष अर्ज भरला हे विशेष. आपल्याला गिरीश महाजन यांचा आशिर्वाद असल्याचे अमोल शिंदे कार्यकर्त्यांना सांगतात, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांच्या या अशा कृतीमुळे सच्चे भाजपचे कार्यकर्ते कदापी सहकार्य करणे शक्य नाही. त्यामुळे महायुतीचे सेना उमेदवार यांच्याच पाठीशी भाजपचे कार्यकर्ते राहतील यात शंका नाही. पालकमंत्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न राहील. लोकसभा निवडणुकीत भाजप- सेनेची युती होती. तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे खा. उन्मेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. एरंडोल- पारोळा मतदार संघात सेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे विरोधात माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. चोपडा मतदार संघात सेनेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवित आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. रावेर विधानसभा मतदार संघात वर्षभरापूर्वी भाजपमध्ये असलेले भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. त्यांना त्यांचे मोठे बंधु माजी आमदार संतोष चौधरी हे सहकार्य करीत आहेत. प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. स्थानिक उमेदवार निवडणुक लढवित असताना भुसावळच्या चौधरी बंधुंना मतदार कितपत साथ देतील हे 24 ला निवडणूक निकालातून स्पष्ट होईल. भाजपमध्ये असताना गिरीश महाजनांचे समर्थक समजणार्‍या अनिल चौधरींना मतदारांकडून कशी साथ मिळते हे स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.