जिल्ह्यातील बंडखोरीला कुणाचा आशिर्वाद?

0

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण 11 मतदार संघात 100 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. बहुतेक सर्वच मतदार संघात बहुरंगी लढती होताहेत असे असले तरी भाजप- शिवसेना दोन्ही काँग्रेसची महाआघाडी, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष प्रामुख्याने आमने- सामने लढताहेत. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शिवसेनेची युती झाली आहे. त्यामुळे भाजप- शिवसेना हे दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिलेले नाहीत. युती धर्म पाळला असे जरी असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्तार्इनगर मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार एकनाथराव खडसेंची कन्या रोहिणी खडसे असताना तेथे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटलांच्या अपक्ष उमेदवारीला राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस,  काँग्रेस महाआघाडीने चंद्रकांत पाटलांना पाठींबा जाहीर केलाय. भाजप- सेनेची युती असताना शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकच्या परवानगीशिवाय घेतला असेल का? चंद्रकांत पाटील म्हणतात मी पदाचा राजीनामा दिलाय. 2014 च्या निवडणुकीत भाजप- सेना युती नसताना चंद्रकांत पाटील यांनी सेनेतर्फे निवडणुक लढविली होती. दस्तुरखुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा मुक्तार्इनगरला झाली होती. त्यावेळची निवडणुक अत्यंत चुरशीची झाली होती आणि अवघ्या दहा हजार मतांनी चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला होता. आता चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी पुरस्कृत असले तरी अपक्ष लढवताहेत. त्यांचे समोर नाथाभाऊंऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे- खेवलकर मैदानात आहेत. चंद्रकांत पाटलांची प्रतिमा आणि रोहिणी खडसे यांची तुलना निश्चित मतदार करणार. रोहिणीची प्रतिमा  स्वच्छ अशी आज तरी आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचे चांगले कार्य आहे. मुक्तार्इ सह. साखर कारखान्याच्या त्या व्हार्इस चेअरमन आहेत.  सूत गिरणीच्यासुद्धा त्या संचालक असून सूतगिरणीचे उत्पादन सुरु झाले आहे. त्याचबरोबर नाथाभाऊंचा राजकीय वारसा त्यांचे पाठीशी असल्याने मुक्तार्इनगर मतदार संघात चंद्रकांत पाटलांना त्या वरचढ ठरु शकतात. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराने बंडखोरी करुन युती धर्म तोडल्याने चंद्रकांत पाटलांना ही निवडणुक सोपी नाही.

मुक्तार्इनगर मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपविरुद्ध बंडखोरी केली असली तर जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण, पाचोरा- भडगाव, चोपडा आणि एरंडोल- पारोळा या चार मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी करुन निवडणुक मैदानात उतरले आहेत. भडगाव मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील असताना भाजपाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी बंडखोरी करुन अपक्ष लढताहेत. अमोल शिंदे हे भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक आहेत. बंडोबा थंडोबा होतील असे गिरीश महाजनांनी केलेले वक्तव्य पाचोरा मतदार संघात फेल ठरतेय. अमोल शिंदेंना अपक्ष उमेदवारी मागे कुणाचा आशर्वाद आहे. याबाबत मात्र उलट- सुलट चर्चा सुरु आहे. भाजप- सेनेची युती झाली नसती तर माजी आमदार दिलीप वाघ हे भाजपाचे अधिकृत उमेदवार राहिले असते, असे  बोलले जाते. भाजप- सेनेची युती झाली अन्‌ दिलीप वाघांचा भाजप प्रवेश रखडला. परिणामी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप वाघ लढताहेत. अमोल शिंदेंची बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडते हे निकालावरुन स्पष्ट होर्इल. जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात भाजपचे भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली आहे. चंद्रशेखर अत्तरदे यांच्या कुटुंबात पत्नी जि.प. सदस्य आहेत. मातोश्री जळगाव महापालिकेत नगरसेविका आहेत. तरीसुद्धा चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून ते शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध लढताहेत चोपडा मतदार संघात शिवसेनेच्या लता सोनवणे यांची अधिकृत उमेदवारी असताना जि.प. सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून लढताहेत. त्याचबरोबर एरंडोल- पारोळा मतदार संघात माजी आमदार चिमणराव पाटील हे सेनेचे अधिकृत उमेदवार असून त्यांचेविरुद्ध माजी नगराध्यक्ष गोविंद  शिरोळे यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. वरील चार मतदार संघात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध भाजपच्या  सदस्यांनी बंडखोरी केलीय. शिवसेनेच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचाच यामागे  डाव तर नाही ना?  असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बंडखोरी करणाऱ्यांवर भाजपने काय कारवार्इ केली हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे यांना भाजपचा छुपा पाठींबा तर नाही ना?  असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. आजच पाचोरा येथे गिरीश महाजन यांची सेनेच्या किशोर पाटलांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. त्या सभेत गिरीश महाजनांनी बंडखोर अमोल शिंदे यांचेविषयी किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वाघ यांचेविषयी काहीही वाच्यता केली नसल्याने सभेला उपस्थित लोकांत कुजबूज सुरु असणे साहजिक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.