शरद महाजनांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने… !

0

जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी कारखान्याच्या काही संचालकांसह काल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शरद महाजनांनी भाजपमध्ये प्रवेश का केला असा प्रश्न यावल व रावेर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेकांना पडला आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपात प्रवेश केला असे जरी शरद महाजन सांगत असले तरी त्यामागचे इंगित वेगळेच आहे हे मात्र निश्चित कारण शरद महाजन यांचे पिताजी कै. जे.टी. महाजन यांची हयात काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेसचे ते निष्ठावंत नेते होते. त्यामुळे शरद महाजन यांना भाजपची उमेदवारी मिळणार आहे का ? भाजपमध्ये गेल्यावर कोणते महत्वाचे पद मिळणार आहे का ? या दोन्ही बाबी सद्यास्थितीवर शक्य नाही. परंतु मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या सध्या डबघार्इस आलेला आहे. कारखाना वाचविण्यासाठी भाजपात प्रवेश केला गेला असे सांगितले जाते हे कारण खरे जरी असले तरी सत्ताधारी भाजपत प्रवेश केल्याने डबघार्इत गेलेला कारखाना वाचणार कसा ? डबघार्इस असलेल्या साखर कारखान्यांना सरकार वाचवणार म्हणजे काय करणार ? कोणत्यातरी वित्तीय संस्थेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जार्इल. त्या कर्जाच्या उपलब्धते नंतर जी काही देणी कारखान्याला द्यायचे आहेत ते देऊन कारखाना सुरु होऊ शकतो. कारखाना सुरु झाल्यानंतर कर्जाची व्याजासह परतफेड कारखान्याला करावी लागणार आहे. त्यामुळे कर्ज जरी उपलब्ध झाले तरी कारखाना सुरळीत चालेल याची खात्री काय? त्यामुळे कारखाना वाचविण्यासाठी म्हणून सत्ताधारी भाजपात शरद महाजन काँग्रेसचा त्याग केला असावा हे मनाला न पटणारी बाब आहे. यामागे काही तरी वैयक्तिक स्वार्थ आहे म्हणूनच महाजनांनी भाजपात प्रवेश केला असावा या तर्काला आधार आहे. कारण सहकारी साखर कारखाना हा काही शरद महाजन यांच्या वैयक्तिक मालकीच्या नाही. त्यावर कारखान्याचे सभासद असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मालकी आहे. चेअरमन या नात्याने ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांना शेतकऱ्यांनी कारखान्यावर संचालक म्हणून पाठवले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांची परवानगी घेऊन त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे का ? सहकारात पक्षाचे राजकारण करू नये असे जरी म्हटले जात असले तरी निवडणूक प्रक्रियेच्या वेळी जेव्हा पॅनल बनवले जातात तेव्हा त्यात पक्षाचा संबंध येतोय कारण यापूर्वी आ. हरिभाऊ जावळे चेअरमन असतांना त्यांच्या पॅनलमध्ये बहुसंख्य संचालक भाजपचेच होते. त्यानंतर भाजपच्या पॅनलचा पराभव करून काँग्रेसी विचारप्रणालीच्या पॅनेल विजयी झाले आणि शरद महाजन चेअरमन झाले. जेव्हा शरद महाजन यांचा भाजप प्रवेश झाला तेव्हा मधुकर सहकारी कारखान्यांवर भाजपची सत्ता अशा प्रकारच्या बातम्या प्रसारीत झाल्या आणि हे वास्तवच आहे. त्यामुळे ताकाला जाऊन लोटा लपवण्याचा प्रकार करण्यात काहीही अर्थ उरत नाही.

ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद महाजन याचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे रावेर- यावल तालुक्यात भाजपाची ताकद वाढेल  असे विद्यमान आ. हरिभाऊ जावळे यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण आ. हरिभाऊ जावळे हे या मतदार संघातील भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत. भाजपची उमेदवारी मिळेल यांची त्यांना खात्री आहे. परंतु आपण निवडून येऊ याची त्यांना खात्री आहे. परंतु आपण निवडून येऊ याची खात्री नसल्यामुळे काँग्रेस पक्षाची तोडफोड करुन आपण निवडून येवू असे त्यांना वाटत असेल तर ते निकालातून स्पष्ट होर्इलच कारण रावेर- यावल तालक्यातील  भाजपच्या निष्ठावंतांना ही प्रकार आवडलेला नाही. ते या प्रवेशाने फारसे समाधानी नाहीत. भाजप- सेनेची युती झाली तर रावेर विधानसभा मतदार संघात बहुरंगी लढत होणार असली तर खरा सामना- भाजप विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारातच होणार आहे. 2014 च्या निवडणुकीत विद्यमान आ. हरिभाऊ जावळे यांचा निसटता विजय झाला होता. 2014 ला मोदी लाट असताना हरिभाऊ जावळे अगदी काढावर विजयी झाले. त्यामुळे भाजप उमेदवारांपुढे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे आव्हान राहणार आहे. रावेर- यावल तालुक्यात काँग्रेसचे नेते कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी तसेच कै. जे. टी. महाजन यांचे कतृत्व मोठे आहे. या दोघांमुळे विकासाची गंगा अगदी खेड्यापाड्यात पोहोचली आहे. त्यांच्याच कारकिर्दीत पायाभूत मुलभूत विकास झालेला आहे. त्यामुळे गावागावात तसेच आदिवासी खेड्या पाड्यातील जनता आजही काँग्रेसला विसरलेली नाही. त्यामुळे रावेर विधानसभा मतदार संघात भाजपसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान राहणार आहे. तसेच इतके वर्ष काँग्रेसच्या संस्कृतीत वावरलेले महाजन यांचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कितपत उपयोग होर्इल हे निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होर्इल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.