नाथाभाऊंना वंचित ठेवण्यामागचे कारण काय?

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिक येथे समारोप झाला. समारोप सभेला अभूतपुर्व अशी गर्दी जमली. होती. या सभेला व्यासपीठावर  पंतप्रधानांच्या आजूबाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या बाजूला भाजपचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि गिरीश महाजनांच्या बाजूला नुकतेच भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले त्यानंतर पंकजा मुंडे त्यानंतर सातव्या क्रमांकावर एकनाथराव खडसेंना पहिल्या रांगेत स्थान होते. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. डॉ. सुभाष भामरे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदींची भाषणे झाली. चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीश महाजनांच्या भाषणाच्या आधी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे भाषण करतील असे सभेला उपस्थित कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु एकनाथराव खडसे यांना जरी व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान मिळाले असले तरी  त्यांना भाषण करण्याची संधी मात्र दिली गेली नाही. ही बाब नाथाभाऊ समर्थक कार्यकर्त्यांना खटकणे साहजिक आहे. कारण 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसेंनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तारुढ झाले पाहिजे. ही त्यांची तळमळ होती. भाजप- सेना युती तोडण्याचे खापरही त्यांनी स्वत:वर ओढवून घेतले होते. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाची किंमत त्यांना मोजावी लागली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी भाजप हा महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान पटकाविले. त्याचा फायदा पुढे भाजप- सेनेची युती झाली असली तरी भाजपचाच मुख्यमंत्री झाला हे विशेष. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकनाथराव खडसे होते. ज्येष्ठ व अनुभवी नेते म्हणून त्यांनी तशी इच्छा व्यक्त करणे काही गैरही नव्हते. परंतु पक्षाने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर केले. त्यामुळे नाथाभाऊंची संधी हुकली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे नाथाभाऊ यांना मंत्रीमंडळात दोन नंबरचे स्थान देवून जवळपास डझनभर खाती त्यांच्याकडे देण्यात आली. महसूलमंत्र्यांसह इतर खात्यांचा कारभार नाथाभाऊंनी झपाट्याने सुरु केला. अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले.  परंतु पुणेच्या भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणाचे बालंट उभे करण्यात आले. त्यात त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्या. झोटींग एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. समितीने आपला निकाल नाथाभाऊंच्या बाजूने दिला. नाथाभाऊ या प्रकरणात निर्दोष सिद्ध झाले. परंतु नाथाभाऊंना महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मात्र स्थान दिले गेले नाही. भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता, पक्ष वाढविण्यासाठी अहर्निष प्रयत्न करणाऱ्या नाथाभाऊंची पक्षाने मोठी कुचंबना केली. तरीसुद्धा  नाथाभाऊ  डळमळले नाहीत. भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा तसूभरही प्रयत्न केला नाही. त्यांच्यावर  झालेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांना त्रास होणे साहजिक आहे. त्या त्राग्यातून ते विधानसभेच्या व्यासपीठावरुन आपल्यावरील अन्यायाची व्यथा त्यांनी स्पष्टपणे मांडली. तेच सत्ताधाऱ्यांना खटकले आणि नाथाभाऊंना सत्तेपासून दूर ठेवले गेले अशीच भावना नाथाभाऊ समर्थकांची झाली. जळगाव जिल्ह्यात भाजपचे  दोन गट पडले. नाथाभाऊंच्या गटांवर अन्याय होवू लागला. तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीत स्नुषा रक्षा खडसे यांना रावेर मतदार संघातून प्रचंड मताधियाने विजयी केले. भाजप पक्षावरील त्यांची निष्ठा ढळली नाही. त्यामुळे  अशा ज्येष्ठ व अनुभवी भाजप नेत्याला पंतप्रधानांच्या सभेत भाषण करण्याची संधी दिली गेली नाही म्हणून समर्थक कार्यकर्ते नाराज असणे साहजिक आहे.

पंतप्रधानासमोर नाथाभाऊंना बोलण्याची संधी दिली असती तर त्यांचे स्पष्टवक्तेपणाचे भाषण निश्चितच गाजले असते. परंतु शासनाच्या विरोधात भाषण करतील याची भिती मुख्यमंत्र्यांना वाटली असावी म्हणून त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. अगदी नवखे खा. डॉ. सुभाष भामरे यांचे भाषण होते मग नाथाभाऊंचे भाषण न होऊ देण्यामागचे कारण काय? महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत नाथाभाऊंचे भाषण आगळे- वेगळे झाले असते एवढे मात्र निश्चित! कारण जळगाव जिल्ह्यात  महाजनादेश यात्रा आली असता भुसावळला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकारांनी नाथाभाऊंना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर अत्यंत चपखलपणे उत्तर फडणवीसांनी दिले होते. मुख्यमंत्री म्हणाले नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या  मंत्रीमंडळात घ्यायचे की केंद्रिय  मंत्रीमंडळात घ्यायचे याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय  नेतृत्वाच्या कोर्टात टाकून मोकळे झाले. असो हा भाजप पक्षाच्या अंतर्गतची बाब आहे. तरी जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना असे वाटते की आपल्या नेत्यांचा सन्मान झाला पाहिजे. परंतु गेल्या साडेतीन वर्षापासून नाथाभाऊंना वंचित ठेवण्यामागचे कारण काय असले पाहिजे हे कालच्या पंतप्रधानाच्या सभेतही दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.